पुणे लोकलसाठी महत्वाचा निर्णय, लवकरच या ठिकाणांवरुन सुटणार लोकल
pune news : पुणे रेल्वे स्थानकावरुन अनेक प्रवाशी गाड्या आणि लोकल सुटतात. आता पुणे शहरात लोकलने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा फायदा होणार आहे. त्यासंदर्भातील महत्वाचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे.
पुणे | 28 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या या लोकलने अनेक जण प्रवास करतात. आता या प्रवाशांबरोबर पुणे रेल्वे स्थानकावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नवीन रेल्वे सुरु होण्यास संधी मिळणार आहे. तसेच लोकलची संख्याही वाढणार आहे. पुणे रेल्वे मंडळाकडून यासंदर्भात निर्णय घेतला गेला आहे.
काय आहे नवीन निर्णय
पुणे रेल्वे स्थानकाजवळ संगम पूल आहे. या ठिकाणी रेल्वेची जागा आहे. या जागेत लोकलसाठी नवीन टर्मिनल उभारण्यात येणार आहे. मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनकडून यासाठी जागा निश्चित केली गेली आहे. त्यासाठी ड्रोनद्वारे छायाचित्रण करण्यात आले. पुणे-लोणावळ दमम्यान गाड्यांची संख्या वाढली आहे. यामुळे या दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरु केले आहे. त्याचवेळी नवीन टर्मिनल बांधण्याचे काम करण्यात येणार आहे.
किती येणार खर्च
आरटीओ कार्यालयाजवळ नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे पाच हजार २०० कोटी रुपये खर्च येणार आहे. रेल्वे स्थानकावर रोज सुमारे २५० गाड्या जातात. तसेच सुमारे दीड लाख प्रवासी प्रवास करतात. पुणे ते लोणावळा या लोकलच्या ३४ फेऱ्या या स्थानकावरुन होतात. नवीन प्रकल्प सुरु झाल्यानंतर मुख्य स्थानकावरील भार कमी होणार आहे.
काय होणार फायदा
नवीन टर्मिनलमुळे पुणे स्थानकावरील ताण कमी होणार आहे. नवीन स्थानकावरुन केवळ लोकल गाड्या सुटणार आहे. यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशी गाड्यांना वेळ आणि जागा मिळेल. प्रवाशी गाड्या आऊटवर थांबवण्यात येणार नाही. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच नवीन रेल्वे सुरु करणे सोयीचे होणार आहे.
नवीन स्थानकावर तीन फालट
नवीन निर्माण करण्यात येणाऱ्या स्थानकावर तीन फालट उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी १६ डब्यांची लोकल थांबवता येणार आहे. यामुळे पुणे स्थानकावरील लोकलचा ताण कमी होणार आहे.