10 दिवसांचं आजारी बाळ, पाणी आलं आणि…, महिलेचा संताप, आपबिती मांडताना अश्रू अनावर
मुसळधार पाऊस आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे सिंहगड परिसरात अनेक जण अडकली होती. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं. या परिसरात कंबरेपर्यंत पाणी साचलं होतं. नंतर एनडीआरएफच्या टीमला परिसरात पाचरण करण्यात आलं. यानंतर अडकलेल्यांना रेस्क्यू करण्यात आलं. बचाव पथकाने पु्ण्याचया निंबजनगर येथे अडकलेल्या अनेक नागरिकांची रेस्क्यू करुन सुटका केली. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली. या दरम्यान रात्रभर आपल्याला काय-काय परिस्थितीचा सामना करावा लागला हे मांडताना एका महिलेला अश्रू अनावर झाले. संबंधित महिलेने प्रशासनावर प्रचंड संताप व्यक्त केला.
पुण्यात पावसामुळे भयानक परिस्थिती बघायला मिळत आहे. मध्यरात्री मुसळधार पाऊस पडल्यामुळे खडकवासला धरणात पाण्याच्या पातळीत वाढ झाली. परिणामी, पहाटे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला. पण या विसर्गामुळे पुण्यात जास्त हाहा:कार झाला. पुण्यातील सिंहगोड रोड परिसरातील अनेक भागांमध्ये कंबरे इतकं पाणी साचलं. नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं. काही ठिकाणी इमारतींचा तळमजला पूर्णपणे पाण्याखाली गेला. यामध्ये घरांचं आणि त्यामधील सामानाचं मोठं नुकसान झालं. काही ठिकाणी नागरिकांना अचानक आलेल्या पाण्यामुळे घर सोडून नातेवाईकांकडे जावं लागलं. संबंधित परिसरात प्रशासन त्यामानाने उशिराने पहोचलं. यामुळे संतापलेल्या एका महिलेने फोनवर प्रशासनातील एका कर्मचाऱ्यासोबत बोलताना संताप व्यक्त केला. यावेळी महिलेला अश्रू अनावर झाले.
“मला काही बोलायचं नाही. त्या आयुक्ताला आधी इथे पाठवा. त्यांनी रात्रीचं पाणी का सोडलं? आम्ही 10 दिवसांचं बाळ पाण्यातून बाहेर काढलं आहे. अडीच किलोचं बाळ आहे. ते बाळ आजारी आहे. आमच्या मदतीला कोणी आलं नाही. तुम्ही लांबून काय नुसत्या बाता करता? आम्ही रात्रीपासून जागी आहोत. इथे कोण आलं आ******”, अशा शब्दातं महिलेने संताप व्यक्त केला.
“आम्हाला न सांगता पाणी सोडलं आहे. आमची सर्व वाट लागली आहे. कुणी इथे यायचं नाही. कुठला नगरसेवक इथे यायचं नाही. आम्हाला तुमचं काही नको. आम्हाला तुमचं खायला नको. आम्ही काही उपाशी राहणार नाहीत. आमचे नातेवाईक आम्हाला द्यायला आहेत. आम्हाला या बदल्यात दुसरी घरे द्या. नाहीतर त्या आयुक्तांना सांगा की, या पाण्याचा बंदोबस्त करा”, असं महिला म्हणाली.
सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा
संबंधित घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “जेव्हा तुम्ही धरणातलं पाणी सोडणार होता तेव्हा तुम्ही त्या भागातील लोकांना का अलर्ट केलं नाही? पुण्यात भयानक परस्थिती आहे. इथे सरकार परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरलं आहे. खडकवासला धरणातून पाणी सोडणार होते तर नागरिकांचं आधी स्थलांतर का केलं नाही?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
अजित पवार काय म्हणाले?
दरम्यान, अजित पवार यांनीदेखील प्रतिक्रिया दिलीय. “आपण ज्यावेळेस पहाटे पाणी सोडण्यास तयारी केली तेव्हा आपण जाणीवपूर्वक उजाडल्यानंतर पाणी सोडलं. पण हे सोडणारं पाणी आणि पुणे शहरात होणारा पाऊस एकत्र झाल्याने ही परिस्थिती उद्भवली”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.