Heat : पुणेकरांना अजून काही दिवस सहन करावा लागणार उन्हाचा चटका! हवामान विभागानं काय सांगितलं?
14 एप्रिलपर्यंत दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार असल्याने पुणेकरांना कडक उन्हापासून दिलासा मिळाला नाही, असे पुण्याच्या भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे.
पुणे : उन्हाचा चटका (Heat) वाढला आहे. ही तर एप्रिलची (April) सुरुवात आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान (Temperature) 43-44च्या आसपास गेले आहे. तर पुण्यात 40च्या दरम्यान आहे. मात्र या वाढच्या उन्हामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. त्यात हवामान विभागाने काही महत्त्वाची माहिती दिली आहे. पुणेकरांचे टेन्शन त्यामुळे अधिकच वाढणार आहे. 14 एप्रिलपर्यंत दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार असल्याने पुणेकरांना कडक उन्हापासून दिलासा मिळाला नाही, असे पुण्याच्या भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे. पुणे, चिंचवडमध्ये शुक्रवारी सर्वाधिक 41.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या काही दिवसांत पुण्यात पावसाची शक्यता नाही. पुढील काही तास अंशतः ढगाळ वातावरण राहील, त्यानंतर आकाश निरभ्र होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
‘पुढील दोन-तीन दिवस तापमान सामान्यपेक्षा जास्त’
पुढील दोन-तीन दिवस तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. शुक्रवारी दुपारी चारनंतर शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सातारा जिल्ह्याच्या काही भागात सायंकाळी मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली, अशी माहिती IMD पुणे येथील हवामान अंदाज विभागाने दिली.
‘काही ठिकाणी आर्द्रतेचे प्रमाण वाढले’
दक्षिण भागात कमी दाबाच्या रेषेचा विस्तार करणारे काही वारे विस्कळीतपणे अस्तित्वात आहेत. त्यामुळे कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील काही भागांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.