Pune News : पुणे शहरात खड्ड्यांमुळे अनोखे आंदोलन, खड्यांचे पूजन करुन वाहिली कुंकू, हळद अन् फुले
Pune News : पुणे शहरातील खड्यांचा विषय गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. शहरातील खड्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने प्रशासनला फटकारले होते. आता शहरात खड्ड्यांसंदर्भात अनोखे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
पुणे | 8 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील खड्ड्यांचा विषय गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन महानगरपालिकेला फटकारले होते. आता राजकीय पक्षाकडून खड्ड्यांवर लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरु केले गेले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून खड्ड्यांचे पूजन करुन गांधीगिरी करण्यात आली. अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अन् ऑनलाईन तक्रारी करूनही रस्त्यावरील खड्ड्यांची दुरूस्ती केली जात नाही. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हळद-कुंकू-फुले वाहून आंदोलन केले गेले. ससाणेनगर रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन करीत पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला. हडपसर भाजी मार्केट ते ससाणे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्ये निर्माण झाले आहे. यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी पुणे दौऱ्यावर आहेत. दुपारी बारामती तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची पाहणी ते करणार आहे. राज्यात यावर्षी पाऊस पुरेसा झालेला नाही. यामुळे येणाऱ्या काळात पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते, हे लक्षात घेऊन आरखडा तयार केला जाणार आहे. तसेच अजित पवार स्वतः बारामती मतदारसंघातील टंचाईग्रस्त गावाची पाहणी करणार आहे.
पुणे विद्यापीठातील पदे कधी भरणार
पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांची पदे सहा महिन्यांत भरण्याचे आदेश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत. त्याचवेळी विद्यापीठातच तब्बल २१० कायमस्वरूपी प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. राज्यातील महाविद्यालयांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त आहे. यामुळे ही पदे कधी भरणार? असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विचारला जात आहे.
पुणे, लोणावळ्यात पावसाचा जोर
पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचे कमबॅक झाले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरूर, जुन्नर भागात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. तसेच लोणावळ्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. लोणावळा शहरात गेल्या 24 तासांत तब्बल 110 मिमी पावसाची नोंद झाल्यामुळे पर्यटकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. विक एंडच्या पार्श्वभूमीवर पावसाला सुरुवात झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.
नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी योगा शिबीर
राजगुरुनगर नगरपरिषदेतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सफाई कामगार यांच्यासाठी मोफत योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या पुढाकारातून हे शिबीर घेण्यात आले. शिबिरात तणावमुक्त कसे राहावे, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, संभाषण कौशल्य कसे सुधारावे, वेळेचे नियोजन कसे करावे, विविध योगासने यांचे मार्गदर्शन करण्यात आले.