पुणेकरांची हौसच वेगळी, ३६ कोटी खर्च केले फक्त पसंतीसाठी
पुणे शहरातील नागरिकांनी मानसिक समाधानासाठी तब्बल ३६ कोटी रुपये खर्च केले आहे. त्यामुळे शासनाचा चांगलाच फायदा झाला आहे. मागील आर्थिक वर्षात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयास ३६ कोटी रुपयांहून महसूल पुणेकरांच्या हौसेमुळे मिळवला आहे.
पुणे : म्हणतात ना, हौसेला मोल नसते, त्याची प्रचिती अनेकांना येते. परंतु पुणेकर प्रत्येक गोष्टीत आपले वेगळेपण जपत असतात. त्यामुळेच पुणे येथे काय उणे म्हटले जाते. पुणे शहरातील नागरिकांनी पसंतीसाठी लाखो नाही तर कोट्यवधी रुपये खर्च केले आहे. ही रक्कम मागील वर्षापेक्षा ६० टक्के जास्त आहे. हौसेला मोल नसते, असे म्हणण्याचे कारण म्हणजे आपण एखादी गोष्ट फक्त एक मानसिक समाधानासाठी करतो. याच मानसिक समाधानासाठी पुणे शहरातील नागरिकांनी तब्बल ३६ कोटी रुपये खर्च केले आहे. त्यामुळे शासनाचा चांगलाच फायदा झाला आहे. ही सर्व कमाई शासनाच्या तिजोरीत गेली आहे.
काय केले पुणेकरांनी
पुणे शहरातील नागरिकांचा वाहनांच्या आकर्षक क्रमांकाकडे कल वाढत आहे. यासाठी लाखो रुपयांचा खर्च करीत आहेत. पसंतीच्या आकर्षक क्रमांकातून मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयास ३६ कोटी रुपयांहून महसूल मिळवला आहे. हा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत ६० टक्क्यांहून अधिक आहे.
कशी झाली कामाई
पुणे शहरातील वाहनांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. मग वाहनांच्या पसंती क्रमांकासाठी लाखो रुपये खर्च पुणेकर करताय. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३६ कोटी २ लाख ६० हजार ५०० रुपये पुणेकरांनी खर्च केले. यापूर्वी २०२१-२२ मध्ये हा खर्च २२ कोटी २१ लाख ५४ हजार रुपये होता. म्हणजे त्यात सुमारे १४ कोटी रुपयांची वाढ झालीय.
काय असते योजना
वाहन खरेदी करताना अनेक जण विशिष्ट क्रमांकाचा आग्रह धरतात. पूर्वी ओळखीने हे क्रमांक मिळत होते. मग चांगले क्रमांक किंवा हवे असणारे क्रमांक विकण्याची योजना शासनाने सुरु केली. आता आरटीओ त्यासाठी वाढीव शुल्क घेते. पसंती क्रमांकासाठी आरटीओकडून अर्ज मागवले जातात. हे अर्ज आल्यानंतर लिलाव प्रक्रियेद्वारे पसंती क्रमांकाचे वाटप होते.
असे असते शुल्क
०००१ या क्रमांकासाठी १ ते ५ लाख रुपये शुल्क आकारले जाते. अनेक जण नोंदणी शुल्काव्यतिरिक्त एवढे पैसे भरून हा वाहन क्रमांक घेतात. त्यानंतर ०००९, ००९९, ०७८६, ०९९९ व ९९९९ या क्रमांकांसाठी ५० हजार ते अडीच लाख रुपये शुल्क आहे. एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करून जास्त बोली लावणाऱ्यास हा क्रमांक दिला जातो.
हे वाचा
पुणे शहरात वाहने वाढली अन् अपघातही, अपघातात दुचाकीस्वारांच्या मृत्यूची संख्या मोठी
पुणे शहरात वाहन खरेदीत मोठी वाढ, कोणत्या वाहनांना आहे पुणेकरांची पसंती?