पुणे | 7 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात काही दिवसांपूर्वी धक्कादायक प्रकार घडला होता. पुणे येथील ससून रुग्णालयातून ड्रग्सचे रॅकेट सुरु होते. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे येथील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दोन कोटींचे अमली पदार्थ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले. १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन नावाचे हे ड्रग्स होते. MD नावाने ओळखले जाणाऱ्या या ड्रग्सच्या माध्यमातून तरुणांना व्यसनाधीन बनवले जात होते. पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून अमलीपदार्थाचा साठा पोलिसांना मिळत आहे.
ससून रुग्णालयात कैद्यांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. या ठिकाणी येरवडा कारागृहातील कैद्यांवर उपचार केले जातात. सामान्य आजार असताना ललित पाटील याच्यावर जून महिन्यापासून ससूनमध्ये उपचार सुरु होते. अगदी काही दिवसात बरे होणाऱ्या आजारावर तो महिने अन् महिने उपचार घेत होता. परंतु उपचाराच्या नावावर रुग्णालयात बसून तो अमली पदार्थांची विक्री करत होता. त्याचे हे प्रकरण उघड झाल्यानंतर छातीत दुखत असल्याचे कारण त्याने दिले. मग त्याला एक्स रे काढण्यासाठी घेऊन जात होते. तेव्हा पोलीस बंदोबस्त असताना तो फरार झाला.
ललित पाटील फरार झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली. पुणे पोलीस आयुक्तांनी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन केले. त्यानंतर या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती तयार केली. पोलिसांकडून या पद्धतीने कारवाई सुरु असताना ललिल पाटील याचा शोध सुरु होता. आता ललित पाटील याला मदत करणारा एक कारचालक पोलिसांना मिळाला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
कैदी असलेला ललित पाटील ससून रुग्णालयात राहून अमली पदार्थांची विक्री करत होता. त्याला त्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांची मदत मिळत असल्याची शक्यता आहे. आता पुणे पोलीस त्यादृष्टीने चौकशी करत आहे. यामुळे या प्रकरणात कोण कोण अडकले आहे? हे काही दिवसांत समोर येणार आहे.