Rain : राज्यात कसा असणार पाऊस, कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट
Weather forecast : राज्यात जुलै महिन्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये चांगला साठा झाला. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यात ऑरेंज अलर्ट रविवारी कुठेही दिला गेला नाही.
पुणे | 5 ऑगस्ट 2023 : राज्यात अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टी झालेल्या विदर्भ आणि कोकणात पाऊस सर्वत्र नाही. मागील दोन, तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असणार आहे. रविवारी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला नाही. परंतु पुणे, सातारा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, बुलढाणा या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण विभाग सोडल्यास ८ ऑगस्टपर्यंत राज्यात पाऊस असणार आहे. तर कोकणात १० ऑगस्टपर्यंत पाऊस असेल. त्यानंतर त्याचा जोर कमी होईल.
मराठवाड्यात मशागतीला वेग
मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यात खरीप पिकांच्या मशागतीला वेग आला आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकरीवर्ग कोळपणी, फवारणीच्या कामात व्यस्त आहे. परभणी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला आहे. त्यामुळे पिके चांगली बहरलेली आहे.
नाशिकमध्ये केळझर धरण ‘ओव्हर फ्लो’
नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही. परंतु धरणाच्या उगम क्षेत्रात झालेल्या पावसामुळे गोपाळसागर केळझर धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. धरणाच्या सांडव्यातून आरम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे आरम नदी वाहू लागली आहे. गोपाळसागर केळझर धरण ओसंडून वाहत असल्याने हरणबारी लाभ क्षेत्रातील गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
खान्देशात जोरदार पाऊस नाहीच
खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परंतु धुळे जिल्ह्याच्या सीमावरती भागामध्ये चांगला पाऊस झाला आहे. यामुळे पांजरा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. जामखेली धरणापाठोपाठ लाटीपाडा धरण 100 टक्के भरले आहे. अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा साठा वाढत आहे.
गोसीखुर्द धरणाचे चार गेट बंद
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे 33 दरवाजे उघडले होते. धरणातून 1 लाख 87 हजार 204 क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला जात होता. मात्र, पाऊस कमी झाल्यामुळे 33 पैकी 4 गेट बंद करण्यात आले आहे. आता 29 गेट अर्धा मीटरने उघडून त्यातून 1 लाख 17 हजार 540 क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.