Rain : राज्यात पावसाची विश्रांती, पण या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
weather update and rain : राज्यात मान्सून लवकरच पुन्हा सक्रीय होणार आहे. हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच शुक्रवारी राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. काही भागांत यलो अलर्ट दिलाय.
पुणे | 4 ऑगस्ट 2023 : राज्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु लवकरच पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. दरम्यान शुक्रवारी पुणे हवामान विभागाने पुणे आणि सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद यासह मराठवाड्यातील काही भागांत यलो अलर्ट दिला आहे.
कुठे काय आहे अंदाज
राज्यात सध्या सर्वत्र पाऊस नाही. राज्यातील काही भागांत पाऊस सुरु आहे. तसेच हवामान विभागाने राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. शनिवारी सातारा, रत्नागिरी, पुणे, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिलाय.
राज्यात या ठिकाणी पाऊस
रत्नागिरी जिल्ह्याला शुक्रवारी अलर्ट दिला आहे. जूनपासून आजपर्यंत पावसाने 2300 मिलिमीटर पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यात चार दिवसांच्या खंडानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्याला आणखी तीन दिवस म्हणजेच 5 ऑगस्टपर्यंत ‘यलो अलर्ट’ दिला आहे. भंडारा जिल्ह्यासह गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यातही वाढ होत आहे. धरणाचे 15 दरवाने अर्धा मीटरने उघडली आहे. धरणातून 62 हजार 935 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.
भाम धरण शंभर टक्के भरले
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भाम धरण शंभर टक्के भरले आहे. केंद्र शासनाने भाम धरणासाठी ५१० कोटींचा निधी दिला होता. या धरणामुळे मराठवाड्याची तहान भागवली जाणार आहे. भाम धरण पहाटे 6 वाजेच्या सुमारास शंभर टक्के भरल्यामुळे मराठवाड्यातील काही भागाची पाण्याची चिंता मिटली आहे.
पवना धरणाची वाटचाल शंभरीकडे
पुणे जिल्ह्यातील मावळात दमदार पडलेल्या पावसामुळे पवना धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरु आहे. या धरणातील पाणीसाठा 93.08 टक्के झाला आहे. आता पवना धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची प्रशासनाने तयारी केली आहे.