पुणे | 9 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातील शाळेत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पुण्यातील पर्वती परिसरात असणाऱ्या मुक्तांगण शाळेत लैंगिक शोषण झाल्याची घटना उघड झाली आहे. त्यानंतर संतप्त पालकांनी शाळा बंद पाडली. सोमवारी शेकडोच्या संख्येने पालक शाळेसमोर एकत्र आले. त्यांनी कारवाईची मागणी करत शाळा बंद केली. यावेळी संतप्त पालकांना समजवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यासंदर्भात तक्रार नोंदवा, दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. शाळेतील लहान मुलांचे दहावी, बारावीच्या मुलांकडून लैंगिक शोषण होत असल्याचा पालकांचा आरोप आहे. पहिली ते चौथीत असणाऱ्या मुलांना आणि मुलींना दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून बॅड टच केला जात असल्याचा आरोप पालकांनी केला.
पुणे विभागात नव्या घरांच्या उभारणीसाठी म्हाडाकडून प्रयत्न सुरु आहे. यासाठी म्हाडाने महसूल विभागाकडे 70 हेक्टर जमिनीची मागणी केली आहे. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे जमिनीची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारींनी सकारात्मक अहवाल आल्यानंतर राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. पुणे म्हाडाची मागणी मान्य झाल्यास स्वस्तात सर्वसामान्यांना घरे मिळणार आहे.
पुणे येथील डॉ.संजय जाचक स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञांच्या यादीत आले आहे. सध्या मोहालीतील राष्ट्रीय औषधी शिक्षण आणि संशोधन संस्थेत ते कार्यरत आहेत. शास्त्रज्ञांचे संशोधन, शोधनिबंधांची संख्या आणि दर्जाच्या आधारे जागतिक स्तरावर ही क्रमवारी जाहीर करण्यात येते. यामध्ये २२ प्रमुख विषयांत आणि १७४ उपविषयांमध्ये शास्त्रज्ञांचे वर्गीकरण केले आहे. डॉ. जाचक एनआयपीआरमधील संसर्गजन्य विकार आणि मधुमेह विभागाचे प्रमुख आहेत.
पुणे जिल्ह्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यात रिक्त असणाऱ्या पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा नुकतीच घेण्यात आली. यावेळी परीक्षा हॉलमध्ये कॅमेराद्वारे शूटिंग करण्यात आले. एकूण 268 जणांनी ही परीक्षा दिली. आता 12 ते 15 ऑक्टोबरदरम्यान कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. तसेच तोंडी परीक्षा आणि मुलाखत घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांची निवड यादी 18 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पुण्याच्या खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. चोर ड्रोन सारख्या हायटेक प्रणालीचा वापर चोरीसाठी करत आहेत. ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करुन चोरी करण्याचा चोरट्यांचा नवीन फंडा आहे. यामुळे ग्रामस्थांची झोप उडाली आहे. चोरट्यांना रोखण्यासाठी तरुण वर्ग गावांमध्ये आणि वस्त्यांमध्ये गस्त घालत आहेत.