पुणे : दौंड तालुक्यातील पारगावमधील भीमा नदीच्या पात्रात सात दिवसांत सात मृतदेह सापडले होते. नदी पात्रात रोज एक मृतदेह सापडत होता. आधी ही आत्महत्या असल्याचे समोर आले होते. मुलाने विवाहिता मुलीस पळवून आणल्यामुळे कुटुंबियांंनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. परंतु ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेले चौघे मृत मोहन पवार यांचे नातेवाईक आहेत.
मोहन उत्तर पवार (वय, ५०) त्यांची पत्नी संगीता (वय, ४५) त्यांची विवाहित मुलगी राणी शामराव फुलवरे (वय, २७ वर्ष) जावई शामराव पंडित फुलवरे आणि नातू मुले रितेश फुलवरे (वय,७ वर्ष), छोटू फुलवरे (वय, ५ वर्ष) आणि कृष्णा फुलवरे (वय, ३ वर्ष) यांचे मृतदेह भीमा नदीपात्रात आढळून आले होते.
भीमा नदीच्या पात्रात 18 जानेवारी रोजी एका महिलेचा, 20 जानेवारी रोजी पुरुषाचा, 21 जानेवारी रोजी महिलेचा, 22 जानेवारी रोजी पुन्हा एक महिलेचा आणि 24 जानेवारी रोजी तीन लहान मुलांचे असे टप्प्याटप्प्याने सात मृतदेह आढळले होते. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हा बुडून झाला असल्याचे समोर आले होते. परंतु नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता.
कोणी केली हत्या
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिलाचा संशय आहे. त्यावरून पोलिसांनी चार जणांवर गुन्हा नोंद करून अटक केली आहे. अशोक कल्याण पवार (वय ४०), श्याम कल्याण पवार (वय ३०), प्रकाश कल्याण पवार (वय ३२) आणि आणखी एक त्यांचा भाऊ अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. हे चौघे जण मोहन पवार यांचे नातेवाई आहे.
का केली हत्या
मोहन पवार यांच्या मुलासोबत आरोपींचा मुलगा काही दिवासांपुर्वी दुचाकीवर गेला होता. त्यावेळी त्याचा अपघात झाला होता. या घटनेत तो मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. या घटनेत त्या मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहन पवार यांच्या कुटुंबियांनी ती हत्या केल्याया संशय आरोपींना होता. त्यातून हे हत्याकांड घडवल्याचा संशय आहे.