१३ दिवसांची वधू पतीसोबत हनीमूनला गेली पण एकटीच परतली, नेमके काय घडले
Pune Crime News : १३ दिवसांपूर्वी दोघांचे लग्न झाले होते. दोन्ही परिवार आनंदात होते. मग दोघांनी लग्नानंतर हनीमूनला जाण्याचा निर्णय घेतला. पुणे येथून निघाले. परंतु त्यानंतर काय झाले नववधू एकटीच परत आली...
पुणे | 6 ऑगस्ट 2023 : लग्नानंतर एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखण्यासाठी पती, पत्नी हनीमूनला जातात. पुणे शहरातील एका दाम्पत्याने अशाच प्लॅन तयार केला. लग्नानंतर १३ व्या दिवशी पुणेवरुन महाबळेश्वरला हानीमूनसाठी निघाले. सोबत पतीने त्याचा एक मित्र अन् तिच्या पत्नीलाही घेतले. कार पुण्यावरुन काही अंतरावर गेली असेल पत्नीने आपला फोन बाहेर काढला. त्यानंतर काही वेळाने फोन पुन्हा आतमध्ये ठेऊन दिला. थोड्या वेळाने अस्वस्थ वाटत असल्याचे सांगत गाडी थांबवली. ती कारमधून बाहेर पडली. पतीही तिच्यासोबत बाहेर पडला. दोघे थोडे लांब चालत गेले.
दोघांनी केला पतीवर हल्ला
पती, पत्नी चालत असताना दोन मोटारसायकलवर चार जण आले. त्यांनी काही न बोलता त्या नववधूच्या पतीवर हल्ला केला. पत्नी आरडाओरड करु लागली. परंतु तिच्या पतीला वाचवण्यासाठी कोणीच आले नाही. त्यात तिच्या पतीचा मृत्यू झाला. लग्नानंतर १३ व्या दिवशी पत्नी विधवा झाली. पुण्यात राहणारा आनंद कांबळे यांच्यासंदर्भात ही दुर्घटना घडली.
दिक्षा म्हणाली अन् पोलिसांना संशय
आनंद कांबळे आणि दिक्षा ओव्हाळ यांचे २०१८ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर १३ व्या दिवशी हा प्रकार घडला. घटनेनंतर दिक्षाला कोणीच मदत केली नसल्यामुळे ती धावत कारमध्ये बसलेला आनंदचा मित्र निखिलकडे आली. त्यानंतर दोघे घटनास्थळी पोहचले. त्यांनी आनंदला रुग्णालायात नेले. परंतु त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांना दिक्षा सांगते ते चार जण लूटमारीसाठी आले होते. त्यावेळी पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी केला तपास सुरु
पोलिसांनी घटनास्थळावर तपास सुरु केला. माध्यमांनी हा प्रकार उचलून धरल्यामुळे पोलिसांवर तपासासाठी दबाब आला होता. पोलीस दिक्षाला बोलवतात अन् तिचे सर्व सामान जप्त करतात. त्यावेळी तिच्या मोबाईलवरुन कोणातरी लाईव्ह लोकेशन पाठवल्याचे दिसते. तसेच हत्येचा एका दिवसापूर्वी दिक्षा बराच वेळ कोणाशीतरी बोलत असल्याचे तपासात उघड झाले.
पोलिसांनी त्या व्यक्तीला घेतले ताब्यात
तपासात दिक्षाने निखिल मालेकर याला लाईव्ह लोकेशन पाठवले होते. पोलिसांनी निखिलला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. यावेळी सर्व प्रकार समोर आला. दिक्षा आणि निखिल यांचे प्रेम करत होते. तिला आनंदशी लग्न करायचे नव्हते. परंतु घरच्या मंडळीच्या दबाबत लग्न केले. यामुळे निखिलने सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली होती.