महामार्गावर विचित्र अपघातानंतर शिवसैनिक आक्रमक, पोलिसांवर केले आरोप
Solapur Accident News : सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात झाला. हा अपघात पोलिसांमुळेच झाल्याचा आरोप करत शिवसैनिक आक्रमक झाले. आक्रमक शिवसैनिकांनी आंदोलन केले. महामार्ग रोखून धरला.
सागर सुरवसे, सोलापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर पोलीस आणि शिवसेनेत वाद झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख अन् पोलिसांत बाचाबाची झाली. या विचित्र अपघातात एका जणाचा मृत्यू झाला. या अपघाताला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
कसा झाला अपघात
सोलापूरातील बाळे येथे चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. एकमेकांवर चार वाहने धडकली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन ते चार जण जखमी झालेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी जवळ कंटेनर थांबला. त्यामुळे त्याला पाठीमागून ट्रक, कार आणि दुचाकीने दिली धडक दिल्यामुळे हा अपघातात झाला. पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदी पॉईंटमुळेच अपघात झाल्याचा शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आरोप करण्यात आला. या अपघातानंतर शिवसैनिक आक्रमक झाले.
शिवसैनिकांचे आंदोलन
अपघातानंतर आक्रमक शिवसैनिकांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग काही वेळसाठी रोखून धरला. शिवसैनिकांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे सोलापूरकडे जाणारी वाहतूक काही काळ थांबली होती. नाकाबंदी पाईंट हलवण्याच्या मागणीसाठी शिवसैनिक आक्रमक होते. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन नाकाबंदी पॉईंट दुसरीकडे हलवण्याचे आश्वसन दिले. तसेच या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी हे आश्वासन दिले.
का केली होती नाकाबंदी
आषाढी वारी आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी बाळे येथे केली होती. नाकाबंदी केलेल्या ठिकाणी विचित्र अपघात झाला. त्याला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. या प्रकाराची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे जिल्हाप्रमुखांनी सांगितले.