Pune News : पुणेकरांसाठी चांगली बातमी, हा बहुचर्चित पूल होणार मुदतीपूर्वी
Pune double deck flyover : पुणे शहरात विकासाची अनेक कामे सुरु आहेत. चांदणी चौकातील बहुचर्चित पूल सुरु झाला आहे. त्यानंतर पुण्यातील दुसऱ्या पुलाचे काम कधी होणार? याकडे लक्ष लागले आहे. त्यासंदर्भातील आदेश दिले गेले आहेत.
पुणे | 4 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरु आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे मेट्रो सुरु झाल्यामुळे अनेकांनी मेट्रोने प्रवास सुरु केला आहे. त्यानंतर चांदणी चौकातील पूल सुरु झाल्यामुळे त्या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. शहरातील सिंहगड रस्त्यावर तीन पूल तयार करुन वाहतूक कोंडी सोडवण्यात येणार आहे. तसेच पुणे येथील प्रतिक्षेतील बहुचर्चित पुलाचे काम वेगाने करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे मुदतीपूर्वी हा पूल सुरु होणार आहे.
कोणत्या पुलाची मिळणार लवकर भेट
पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात दुमजली डबल डेकर पुलाचे काम वेगाने सुरू आहे. या पुलाचे काम मुदतीपूर्वी करण्याचे आदेश पुणे मेट्रोपॉलिटन रीजन डेवलपमेंट अथॉरिटी (PMRDA) कडून देण्यात आले आहे. हा पूल नोव्हेंबर 2024 मध्ये पूर्ण होणार होता. आता तो ऑगस्ट 2024 करण्याचे सांगितले आहे. चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे काम लवकर करण्याचे सांगितले होते. त्यानंतर यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
कधी सुरु झाले होते पुलाचे काम
कोरोना काळात एप्रिल-मे २०२० दरम्यान पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यात आला होता. त्यानंतर पीएमआरडीएने याठिकणी दुमजली पूल बांधायची घोषणा केली होती. पुलाच्या पहिल्या मजल्यावर दुचाकी-चारचाकी वाहने धावणार तर त्यावरून मेट्रो धावणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर २३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. या ठिकाणी पुणे विद्यापीठात दुमजली पूल केला जात आहे.
मेट्रो कधी सुरु होणार
हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. हे काम एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करा, त्यासाठी राज्य सरकारकडून सर्व परवानगी आणि मदत दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत सांगितले होते. त्यामुळे ही मेट्रोही लवकर सुरु होणार असण्याची अपेक्षा आहे.
सिंहगड रस्त्यावर पूल होणार
सिंहगड रस्ता परिसरात वाहतूक कोंडी नेहमीची आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पुणे महापालिकेतर्फे दांडेकर पूल चौकात पूल बांधण्यात येणार आहे. तसेच नगर रस्त्यावर पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.