मंदिरातील ड्रेस कोडवरुन राजकारण पेटले,…मग पुजाऱ्यांनीही अर्धवट कपड्यात जाऊ नये…
Pune News : पुणे येथील वाघेश्वर मंदिरासाठी ड्रेस कोडचा नियम केला गेला आहे. त्यानंतर त्यासंदर्भात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजकीय पक्षांकडून या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही जणांनी समर्थन केले आहे तर काहींनी विरोधी सूर लावलाय.
पुणे : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात प्रवेशासाठी काही दिवसांपूर्वी नियमावली तयार केली होती. मंदिरात प्रवेशासाठी ड्रेस कोड लागू केला होता. परंतु त्यानंतर मंदिर संस्थानने यु टर्न घेत सात तासांत निर्णय फिरवला. तुळजापुरात हा निर्णय अयशस्वी झाला असला तरी पुण्यात ड्रेस कोडचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुणे शहरातील वाघेश्वर मंदिरासाठी ड्रेस कोडचा नियम केला गेला आहे. त्यानंतर ड्रेसकोडवरुन राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ड्रेस कोडचे समर्थन केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रसेचे आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधी सूर लावला आहे. स्वराज्य संघटनेचे नेते संभाजी राजे यांनी ड्रेसकोडचे समर्थन केले आहे.
काय म्हणाले अमोल मिटकरी
पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यानंतर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, ड्रेस कोड संदर्भात हा निर्णय फक्त भाविकांसाठी आहे का पुजारींसाठी आहे, हे स्पष्ट करावे. नागरिकांनी अर्धवट कपड्यात मंदिरात जाऊ नये, असे ते सांगत असतील तर पुजारींनी देखील अर्धवट कपड्यात मंदिरात जाऊ नये. संविधानाच्या नियमानुसार नियमावली सर्वांना सारखी पाहिजे. त्यामध्ये महत्त्वाचे विषय बाजूला राहतात. अन् असले विषय समोर येतात, असे आमदार मिटकरी म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले होते
शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी ड्रेसकोडचे समर्थन केले होते. वर्षानुवर्षे जसे कपडे परिधान केले जातात, तसेच कपडे आणि गणवेश परिधान करावेत. आता मंदिरात कोणते कपडे घालावे? हा प्रश्न आहे. पण मंदिरांमध्ये तोकडे कपडे कोणी घालून येऊ नये, असे अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले होते.
संभाजी राजे काय म्हणाले
मंदिरात असलेले रूढी परंपरा पाळायला हवेत. संस्कार सांभाळून देवाचे दर्शन घ्यायला हवे. सलवार कमीज साडी, असे चांगले कपडे घालायला हवे, असे स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजी राजे यांनी म्हटले आहे.
निवडणुकीवर अमोल मिटकरी म्हणाले
पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत अजित पवार यांनी आजच सांगितले आहे. ज्यांची जास्त ताकद ते त्या ठिकाणी निवडणूक लढतील. पुणे लोकसभा मतदारसंघात जर काँग्रेसची ताकद जास्त असेल, अन् काँग्रेसचा दावा असेल तर ते निवडणूक लढवतील. निवडणुकीचा निर्णय महाविकास आघाडीने एकत्र येऊन घ्यावा, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.