विमान अन् हेलिकॉप्टरने चारधाम यात्रा करण्याचे दिले आश्वासन, मात्र भाविकांची केली लाखोंमध्ये फसवणूक
Crime News : सोलापूर जिल्ह्यातील भाविकांची पुणे येथील ट्रॅव्हल कंपनीकडून फसवणूक झाली आहे. चारधाम यात्रेच्या नावाने ५० भाविकांची लाखो रुपयांमध्ये फसवणूक झाली आहे.
सागर सुरवसे, सोलापूर : फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार सध्या समोर येऊ लागले आहेत. त्यात सोशल मीडियातून फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार घडत आहे. सोलापूर जिल्ह्यातील काही भाविकांना चारधाम यात्रा करायची होती. त्यांनी फेसबुकवरुन ट्रॅव्हल कंपन्यांचा शोध सुरु केला. अखेरी पुणे येथील एका कंपनीशी सर्व बोलणी झाली. पॅकजे, येण्याचे-जाण्याचे मार्ग, दिवस अन् इतर खर्चासंदर्भात बोलणी झाली. मग पैसेही जमा केले गेले. परंतु दिलेल्या तारखेला यात्रा निघाली नाही. त्यानंतर दिलेले पैसे देण्यास नकार देण्यात आला. तब्बल ५० भाविकांची ही फसवणूक झाली आहे.
काय आहे प्रकार
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील 50 भाविकांना चारधाम यात्रा करायची होती. त्यासाठी त्यांनी काही ट्रॅव्हल कंपन्यांचा शोध सुरु केला. सोशल मीडियाचा वापर करुन त्यांनी कंपन्या शोधण्याचे काम केले. त्यांना पुणे येथील ड्रीम कस्टर टूर्स ट्रॅव्हल्स या कंपनीचा शोध लागला. कंपनीचे संचालकांशी त्यांनी संपर्क केला. त्यांची बोलणी झाली.
काय झाली बोलणी
कंपनीचे पॅकेज आणि टुर कसा असणार यासंदर्भात चार संचालकांशी चर्चा झाली. पुणे शहरातून चारधाम यात्रेच्या ठिकाणी नेण्यात येणार होते. पुणे ते दिल्ली हा प्रवास विमानाने करण्यात येणार होता. त्यानंतर केदारनाथ पायथा ते केदारनाथ मंदिर असा प्रवास हेलिकॉप्टरने करण्याचा निर्णय झाला. तसेच हरिद्वार, बारकोट, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ हा प्रवास बसने करण्याचा निश्चित करण्यात आले. एकूण दहा दिवस अन् अकरा रात्रीचा हा टूर पॅकेज होता. त्यात प्रवासातील सर्व खर्च ट्रॅव्हल कंपनी करणार होती. 50 भाविकांनी विविध माध्यमातून 12 लाख 50 हजार रुपये यात्रा कंपनीकडे भरले होते.
अन् कंपनीकडून कारणे…
चारधाम यात्रा ४ मे पासून सुरु होणार होती. परंतु कंपनीने विविध कारणे देत यात्रा टाळण्यास सुरुवात केली. कधी खराब हवामान, बर्फवृष्टी होत असल्याचे सांगितले गेले. सध्या यात्रा रद्द झाली आहे, पुढची तारीख कळवतो किंवा पंधरा दिवसात पैसे परत देऊ, असे सांगण्यात येत होते. त्यासाठी कंपनीचे संचालक करमाळा येथेही आले. यानंतर वारंवार संपर्क केल्यावर कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. तुम्ही काही करा, पैसेही मिळणार नाही, असे शेवटी त्यांना सांगण्यात आले. अखेर तब्बल महिना उलटून गेल्यानंतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. भादवी 420/34 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणावर केला गुन्हा दाखल
भाविकांनी केलेल्या तक्रारीवरुन संकेत भंडाळे, ऋषिकेश भंडाळे, सुप्रिया भंडाळे आणि बालाजी सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत .