धक्कादायक! पुण्यातली गुन्हेगारी तरुणांच्या मानसिकतेत झिरपतेय? कामावरुन काढलं म्हणून थेट…
पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन तरुणांना कामावरुन काढलं म्हणून त्यांनी टोकाचं कृत्य केलं आहे. त्यांच्या या कृत्यावर स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पुण्यात सध्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहे. असं असताना आता हडपसरमधील दोन तरुणांनी केलेल्या कृत्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
अभिजित पोते, Tv9 मराठी, पुणे | 14 डिसेंबर 2023 : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयत. दररोज नवनव्या गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. कोयता गँगच्या दहशतीच्या बातम्या सातत्याने समोर येत असतात. याशिवाय खून, चोरी, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, याशिवाय दहशतवाद्यांचे कट अशा धक्कादायक बातम्या पुण्यातून येत असतात. या घटनांमुळे पुणेकरांनादेखील धडकी भरणं साहजिक आहे. पोलीस यंत्रणा या घटनांना आळा घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. पोलिसांकडून अनेक गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्यातही येत आहे. पण आता ही गुन्हेगारी, दादागिरी पुण्यातील काही तरुणांमध्ये शिरु लागली तर नाही ना? असा भीतीदायक प्रश्न निर्माण व्हावा तशी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील महत्त्वाचं मानलं जाणाऱ्या हडपसर येथून ही घटना समोर आली आहे.
पुण्यात दोन तरुणांना कामावरुन काढण्यात आलं. या दोन्ही तरुणांना कामावरुन काढल्याबद्दल इतका राग आला की त्यांनी थेट संबंधित कार्यालयाची धारदार शस्त्राने तोडफोड केली. संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर कार्यालयात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण आहे. कामावरुन काढून टाकणं ही गोष्ट खरंच खूप वाईट आहे. पण त्याचा राग मनात धरुन थेट ऑफिसचं तोडफोड करण्याचा हिंसक कृत्य करणं अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे तरुणांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला हवं, अशी चर्चा आता हडपसरमधील नागरिकांमध्ये सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
कामावरुन काढून टाकल्याच्या कारणावरुन दोन तरुणांनी ऑफिसमध्ये शिरुन धारदार शस्त्राने सामानाची तोडफोड केली. हे तरुण तोडफोडीपर्यंतच थांबले नाहीत तर त्यांनी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे 15 नंबर येथील टीव्हीएस शोरुम येथे काम करत होते. त्यांना कामावरुन काढून टाकले होते. याच कारणावरुन आरोपींनी बुधवारी (13 डिसेंबर) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये आले. त्यांनी सोबत आणलेल्या लोखंडी धारदार हत्याराने फिर्यादी यांच्या ऑफिसमधील संगणक, प्रिंटर आणि इतर वस्तूंची तोडफोड केली. अभिजीत चव्हाण आणि रोहित चव्हाण असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांची या प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.