पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार; परीक्षा 10 दिवसांवर येऊन ठेपली तरी वेळापत्रक नाही
तब्बल 6 लाख विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा देणार आहेत. | Pune University exam
पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन परीक्षा घ्यायचा घाट घातलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) भोंगळ कारभाराचा नमुना समोर आला आहे. विद्यापीठातील परीक्षेसाठी 10 दिवस उरले असतानाही अजूनही विद्यार्थ्यांना वेळापत्रक देण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या पालक आणि विद्यार्थ्यांवरील तणाव वाढला आहे. (Pune University online exam)
पुणे विद्यापीठातील सत्र परीक्षेला अवघे 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. तरी अजून विद्यापीठ प्रशासाने सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या नियोजनात अडचणी येत आहेत.
आता 11 एप्रिलपासून सत्र परीक्षेला सुरुवात होईल. कोरोनाच्या संकटानंतर ही विद्यापीठातील पहिलीच सत्र परीक्षा आहे. तब्बल 6 लाख विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा देणार आहेत. मात्र, वेळापत्रक देण्यातील दिरंगाई पाहता प्रत्यक्ष परीक्षा सुरु झाल्यावर आणखी गोंधळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेवेळीही असाच गोंधळ उडाला होता. परीक्षा सुरु झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाली नव्हती. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाबाहेर आंदोलन केले होते.
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 14 मार्चला होणारी पूर्व परीक्षा (MPSC exam) पुढे ढकलल्यामुळे पुण्यात संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. पुण्यात एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी ग्रामीण भागातील जवळपास लाखभर विद्यार्थी वास्तव्याला होते. या विद्यार्थ्यांचा महिन्याचा खर्च जवळपास 7000 रुपये इतका आहे. राज्य सरकारने आतापर्यंत एमपीएससीची परीक्षा पाचवेळा पुढे ढकलली आहे.
आता पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलल्यास ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होईल, असे सांगत हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारपरिषद घेऊन तातडीचा खुलासा करावा लागला होता. कोरोनामुळे पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. अखेर विद्यार्थी संघटनांच्या दबावामुळे 21 मे रोजी एमपीएससीची पूर्व परीक्षा पार पडली होती.
संबंधित बातम्या:
MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, पुण्यात राडा
(Pune University online exam)