पुणे विद्यापीठात पारंपारिक अभ्यासक्रमाचे प्रवेश घटले, व्यवसायिक अभ्यासकमांना विद्यार्थ्यांची पसंती!
गेल्या चार वर्षांत पुणे विद्यापीठात पारंपारिक मानल्या जाणाऱ्या कला (Arts), विज्ञान (Science) आणि वाणिज्य (Commerce) शाखांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्याचं दिसत आहे. पारंपारिक अभ्यासक्रमांपेक्षा नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाला विद्यार्थी पसंती देत असल्याचं समोर आलं आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) राज्यभरातले विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी येत असतात. विद्यापीठातल्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो. पण गेल्या चार वर्षांत पुणे विद्यापीठात पारंपारिक मानल्या जाणाऱ्या कला (Arts), विज्ञान (Science) आणि वाणिज्य (Commerce) शाखांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्याचं दिसत आहे. पारंपारिक अभ्यासक्रमांपेक्षा नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाला विद्यार्थी पसंती देत असल्याचं समोर आलं आहे. विद्यापीठाने नुकताच त्यासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. (Pune University has more students enrolling in vocational courses than traditional courses)
पुणे विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये पारंपारिक विद्याशाखांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश घटत चालल्याचं दिसत आहे. विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे, नाशिक, अहमदनगर आणि सिल्वासा अशा चार विभागांमधल्या विद्यार्थ्यांची ही माहिती आहे.
व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची पसंती
पारंपारिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत असला तरी नाविन्यपूर्ण, कौशल्याआधारित आणि व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थी पसंती देत असल्याचं विद्यापीठाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. यामध्ये इंजिनिअरिंग (Engineering), औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy), कायदा (Law), मॅनेजमेंट (Management) अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या काही वर्षांत वाढली आहे.
गेल्यावर्षी पुणे विद्यापाठात इंजिनिअरिंगच्या 54 हजार 469 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. दोन वर्षांत इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 21 हजारांनी वाढली आहे.
कौशल्यआधारित अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ
2018 मध्ये कायदेविषयक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 6,886 होती. ती 2021 मध्ये वाढून 7,534 झाली आहे. 2018 मध्ये मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमांसाठी 13,689 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, या विद्यार्थ्यांची संख्या 2021 मध्ये वाढून 15,946 झाली आहे. तर 2018 ते 2021 या दोन वर्षांत औषधनिर्माणशास्त्र विषयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सरासरी अडीच हजारांची वाढ झाली आहे.
2018 मध्ये 5,260 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता, तर 2021 मध्ये 7,552 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यासोबतच कला, विज्ञान आणि वाणिज्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन वर्षांत सरासरी 10 ते 12 हजारांनी कमी झाली आहे.
वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांची पसंती कायम
दरवर्षी पारंपारिक विद्याशाखांना विद्यार्थ्यांचा कल कमी होत असला तरी वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांची पसंती कायम असल्याचं दिसत आहे. पारंपारिक शाखांमध्ये वाणिज्य शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. दरवर्षी वाणिज्य शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सरासरी कला आणि विज्ञान शाखेपेक्षा 20 ते 25 हजारांनी जास्त आहे. त्यामुळे इतर विद्याशाखांच्या तुलनेत वाणिज्य शाखेत सर्वाधिक विद्यार्थी असल्याचं विद्यापीठाच्या अहवालात स्पष्ट झालं आहे.
इतर बातम्या :