अभिजित पोते, पुणे | 2 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा विजय ढुमे याचा निर्घृणपणे खून झाला होता. पुणे शहरातील लांबलेली विसर्जन मिरवणूक नुकतीच पूर्ण झाली होती. त्यानंतर संध्याकाळी 6:45 वाजता खुनाचा प्रकार घडला होता. या प्रकरणाचा तपास वेगाने करत पोलिसांनी आरोपींना पकडले आहे. अवघ्या 36 तासांचा आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी बांधल्या.
पुणे येथील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा विजय ढुमे याचा शुक्रवारी खून झाला होता. सिंहगड रस्त्यावर असलेल्या कॉलिटी लॉजमधून विजय ढुमे संध्याकाळी बाहेर पडत होते. त्यावेळी चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. काही समजण्यापूर्वी हल्लेखोरांनी बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळ्या आणि लाकडी दांडक्याने जोरदार वार केले. विजय ढुमे यांच्या डोक्यावर जोरदार मार बसला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
विजय ढुमे याचा खून झाल्यानंतर अवघ्या काही 36 तासांत पुणे पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची उकल केली आहे. यासाठी पोलिसांनी 60 ते 70 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर या प्रकरणातील पाच आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे तपासातून समोर आले आहे. विजय ढुमे यांचे जुने प्रेम प्रकरण त्यांच्या खुनासाठी निमित्त ठरले. विजय ढुमे सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा होता. त्यांचे अनेक बड्या पोलिस अधिकार्यांशी मैत्रीचे संबंध होते.
पोलिसांनी विजय ढुमे याची जुनी प्रियेसीकडे कसून चौकशी केली. त्यानंतर तिने तिचा नवीन प्रियकर संदीप तुपे आणि इतरांच्या मदतीने हा खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात सुजाता समीर ढमाल (राहणार, किरकिटवाडी, पुणे), तिचा प्रियकर संदीप दशरथ तुपे, सागर संजय तुपसुंदर, प्रथमेश रामदास खंदारे आणि एका अल्पवयीन मुलास अटक केली आहे.