प्रदीप कापसे, पुणे : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आणि इंटेलिजेन्स ब्यूरोकडून (आयबी) ३ जुलै रोजी पुणे शहरात मोठी कारवाई झाली होती. या कारवाईत ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीला अटक केली होती. कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीत राहणारा जुबेर शेख (वय ३९ वर्ष) यास अटक केली. त्यानंतर एनआयए त्याची कसून चौकशी करत आहे. या चौकशीतून धक्कादायक माहिती मिळत आहे.
पुण्यातील कोंढव्यातून एनआयएने ताब्यात घेतलेल्या जुबेर नुर मुहम्मद शेख याने देशभर कनेक्शन तयार केले आहे. तो इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. या संघटनेत भर्ती करण्यासाठी तरुण, तरुणी तो शोधत होता. त्यांना वेगवेगळी आमिष दाखवून त्यांची इसिसमध्ये भरती करत होता. सोशल मिडीयावरून मनपरिवर्तन करण्याचा तो प्रयत्न करत होता. एनआयएला त्याच्या कारवायांची माहिती मिळाल्यानंतर त्याला ३ जुलै रोजी पुणे शहरातून अटक करण्यात आली.
एनआयएने मागील आठवड्यात मुंबई, ठाणे आणि पुणे या ठिकाणी छापे टाकले होते. मुंबईतून ताबीश नासेर सिद्दीकी याला अटक केली. त्यानंतर पुण्यातून जुबेर नूर मोहम्मद शेख तर ठाणे शहरातून शरजील शेख, झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली. त्यांच्यांकडून इसिससंदर्भातील महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. तसेच काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स जप्त केले होते. त्यामाध्यमातून इसिस मॉडलचा खुलासा झाला आहे. इसिसच्या कटाचा भाग म्हणून राज्यात स्लीपर सेल तयार करण्याचे काम जुबेर करत होता.
एनआयएने अटक केलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यांवर देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व भंग करण्याचा आरोप आहे.
हे ही वाचा
पुणे शहरातील सॉफ्टवेअर इंजिनिअर पाकिस्तानच्या संपर्कात, अनेक वर्षांपासून करत होता हा उद्योग