पुणे | 24 सप्टेंबर 2023 : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले असो की वाबळेवाडी शाळेमधील मुख्यध्यापक दत्तात्रय वारे असो यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना वेगळी ओळख निर्माण करुन दिला. शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढत आंतरराष्ट्रीय पातळीच्या सुविधा त्यांनी दिल्या. यामुळे त्यांच्या कार्याची दखल देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी शाळेमधील तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यांनी आरोप केले होते. त्यावर चौकशी समिती नियुक्ती केली गेली. या चौकशी समितीचा निकाल आला आहे. त्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली.
शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत दत्तात्रय वारे मुख्याध्यापक होते. त्यांनी या शाळेचा कायापालट केला. शाळेत आंतरराष्ट्रीय पातळीच्या सुविधा तयार केल्या. यामुळे राज्यभरात वाबळेवाडी पॅटर्नची चर्चा झाली. परंतु दत्तात्रय वारे यांनी शाळेत शाळाबाह्य व्यक्तीकडून शुल्क घेतल्याचा आरोप २०२१मध्ये झाला. पुणे जिल्हा परिषदेतील सर्वसाधरण सभेत सदस्यांनी या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. त्यावरुन गदारोळ झाला होता. त्यामुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कारवाई करत दत्तात्रय वारे यांचे तात्पुरते निलंबन केले. तसेच विभागीय चौकशी समितीमार्फत करण्याचा निर्णय घेतला.
दत्तात्रय वारे यांची दोन वर्षे विभागीय चौकशी सुरू होती. समितीने या चौकशीत त्यांच्यावर झालेल्या आरोपांसंदर्भातील अहवाल दिला. त्या अहवालात दत्तात्रय वारे यांनी हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर आणि प्रशासकीय कामात निष्काळजी केल्याचा आरोप सिद्ध होत नसल्याचे म्हटले आहे. यामुळे वारे यांना दोषमुक्त करण्यात आले. त्यांचा निलंबन कालावधी सेवाकाळ गृहीत धरत असल्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिले. दरम्यान, आता वारे गुरुजी यांची खेड तालुक्यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेत बदली करण्यात आलेली आहे.
स्थानिक राजकारणामुळे दत्तात्रय वारे यांच्यावर आरोप झाल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले होते. शाळेसाठी गावकऱ्यांनी लाखो रुपये जमविले, त्यावेळी त्यांनी काही कंपन्यांकडून निधी मिळवला, त्याचा हिशोब गावकऱ्यांनी ठेवला होता. मग या प्रकरणात मुख्याध्यापकांचा संबंध येतो कुठे? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला होता. एकीकडे सरकारी शाळांची दुरावस्था होत असताना राजकारणासाठी चांगल्या शिक्षकांना त्रास देण्याच्या या प्रकारमुळे नाराजी व्यक्त होत आहे.