पुणे शहराची चर्चा देशभरात होत असते. कारण पुणे हे शिक्षणाचे शहर आहे. पुणे हे उद्योगाचे शहर आहे. पुणे हे संस्कृतीचे शहर आहे. पुणेरी लोकांनी जगभरात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. या पुणे शहरातील पुणेरी पाट्या नेहमीच चर्चेच्या असतात. नियम न पाळणाऱ्यांना शब्दांचा मारा पुणेरी पाट्यातून दिला जातो. तसेच सामाजिक विषयाकडे लक्ष वेधले जाते. या पुणेरी पाट्यांमध्ये दोन ग्रुपमध्ये लढाई सुरु झाली आहे. त्या लढाईची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे. पुण्यात दोन वेगवेगळ्या पाट्या या दोन्ही ग्रुपने लिहिल्या आहेत. त्यातील मस्त ग्रुपच्या पाटीला त्रस्त ग्रुपने जोरदार उत्तर दिले आहे. त्याची चर्चा होत आहे.
पुणेरी पाट्यांची देशात, जगात सगळीकडे जोरदार चर्चा होत असते. आजही दोन पुणेरी पाट्या लक्ष वेधून घेत आहेत. पुण्यातील प्रभात रोडवर हिरवाई उद्यानाच्या गेटवर दोन पाट्या लावल्या आहेत. पहिली पाटी मस्त ग्रुपने लावली आहे. त्या पाटीवर महिलांना उद्देशून लिहीले आहे की, ”महिलांनो असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेने बघता कामा नये ” त्या पाटीला त्रस्त ग्रुपने उत्तर दिले आहे. त्यासाठी मस्त ग्रुपने लावलेल्या पाटी शेजारीच दुसरी पाटी लावली आहे. त्रस्त ग्रुपच्या त्या पाटीत लिहिले आहे की ”मन इतकं निखळ ठेवा की कोणी कसेही कपडे घातले तरी नजर घसरता कामा नये.” या दोन्ही पाट्यांची पुण्यात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात चर्चेत असतात. पुण्यात नुकतेच वारकरी धारकरी संगम हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केले. त्यात ते म्हणाले की, वटसावित्रीच्या पूजेला नटीनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावे. त्यांच्या या विधानानंतर गोंधळ झाला. राज्यभरात संभाजी भिडे यांच्यावर टीका होऊ लागली. त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने झाली.
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर पुण्यात महिल्यांच्या कपड्यांसंदर्भात चर्चा सुरु झाली. त्या चर्चेतून या पाट्यांचा जन्म झाला आहे. महिलांना कपड्यांबाबत सल्ला देणाऱ्या पुरुषांना महिलांनी पाट्याच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले आहे. त्यात पुणेरी महिलांची पुणेरी स्टाईल दिसून आली आहे.