पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीची (Pune by elections) अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपलीय. मात्र आता काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरी झालीय. कसब्यातून काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर (Balasaheb dabhekar) यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. ते निवडणूक लढवण्यावर ठाम होते. आता आपण माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु गुरुवारी त्यांच्या उमेदवारीवरुन चक्र फिरली. त्यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी फोन केला. दोघांमध्ये संवाद झाला. त्यानंतर बाळासाहेब दाभेकर यांनी आपला निर्णय बदलला.
कसब्यातून काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर (Balasaheb dabhekar) यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळी ते म्हणाले, ‘ पक्षाने माझ्यावर अन्याय केला. माझं वय ६० वर्ष, ४० वर्षे मी पक्षासाठी काम केलं, मग आता लढणार नाही तर कधी? काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांच माझ्याशी बोलणं झालं नाही.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आला होता पण मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे. मी कसबा पोटनिवडणूक लढवणारच आहे. आता मी माघार घेणार नाही. आता मी काँग्रेस भावनातही जाणार नाही. हा निर्णय मी पक्षाला देखील कळवला आहे’.
अशी झाली नाराजी दूर
गुरुवारी बाळासाहेब दाभेकर यांना राहुल गांधी यांचा फोन आला. त्यानंतर त्यांनी माघार घेतली. बाळासाहेब दाभेकर म्हणाले की, माझी अनेकांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी निवडणूक लढवण्यावर ठाम होतो. मात्र राहुल गांधींच्या फोननंतर मी तयार झालो. राहुल गांधी यांनी माझी नाराजी दूर केली आहे. आता मी पक्षावर नाराज नाही. उमेदवारी अर्ज मी मागे घेणार आहे.
काँग्रेसला दिलासा
कसबा पेठ मतदार संघातून रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे बाळासाहेब दाभेकर पक्षावर नाराज झाले. त्यांनी बंडखोरी करत आपला अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जामुळे काँग्रेसच्या मतांची विभागणी होणार होती. परंतु आता त्यांनी माघार घेतल्यामुळे काँग्रेसला दिलासा मिळाला आहे.
रवींद्र धंगेकर यांचा गौप्यस्फोट
कसबा पेठेचे काँग्रेस रवींद्र धंगेकर यांनी मोठ्या उत्साहात प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस अंतर्गत गटबाजी मोडून काढण्यात त्यांना यश आलंय. फक्त काँग्रेसच नव्हे तर भाजप आणि मनसेतही माझे मित्र आहेत. या निवडणुकीत भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांचीही मला साथ आहे, असा गौप्यस्फोट रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.