विधानसभा अध्यक्षांकडून निष्पक्ष भूमिकेचे दर्शन, राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपदी भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी विरोधी पक्षाच्या चार सदस्यांना कामकाज सल्लागार समितीत समाविष्ट केले आहे. हिवाळी अधिवेशन नागपुरात 16 ते 21 डिसेंबर दरम्यान होणार असून, कामकाज सल्लागार समितीची पुढील बैठक 18 डिसेंबरला होईल.
विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निष्पक्ष भूमिकेचे दर्शन घडवले आहे. राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षाकडे आवश्यक संख्या नसतानाही कामकाज सल्लागार समितीवर त्यांच्या सदस्यांची नेमणूक केली आहे. विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीवर 12 सदस्य असतात. किमान 22 सदस्य असलेल्या पक्षाचा एक सदस्य कामकाज सल्लागार समितीवर नेमला जातो. पण यावेळी विरोधकांकडे तितकी सदस्य संख्याही नाही. असं असताना विधानसभा अध्यक्षांनी सदस्य संख्या नसतानाही विरोधी पक्षांच्या 4 जणांची निमंत्रित सदस्य म्हणून नेमणूक केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी विरोधी बाकावरील जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनिल प्रभू, नाना पटोले यांची या समितीत नियुक्ती केली आहे.
विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत येत्या 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विरोधी पक्षातील जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते.
सल्लागार समितीची आता कधी बैठक होणार?
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पुढची बैठक कधी घ्ययाची? हे देखील ठरवण्यात आलं आहे. कामकाज सल्लागर समितीची हिवाळी अधिवेशनादरम्यान 18 डिसेंबरला बैठक होणार असल्याची माहिती आहे. विधिमंडळाचं सध्या 21 डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, विरोधकांकडून विरोधी पक्षनेत्यांसंदर्भात भूमिका बैठकीत मांडली गेली नसल्याची माहिती आहे. फक्त कामकाजावर बोलणं झाल्याची माहिती आहे.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया काय?
“माझी आज बिनविरोध निवड झालेली आहे. राज्यातील 13 कोटी जनतेचे नेतृत्व करणाऱ्या लोक प्रतिनिधींना मी बोलण्याची संधी देईन”, अशी पहिली प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली. “नियमात जे असेल त्यानुसार संधी देईन. सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून ज्यांनी मतदान केले त्यांच्यावर अन्याय करू नका. जनतेच्या कोर्टात मी गेलो. मला 50 हजारचे लीड मिळाले. जे टीका करतात त्याकडे मी लक्ष देणार नाही. जरी विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांना बोलण्याची संधी मी देईन. कामकाज सल्लागार समितीत त्यांची संख्या बसत नसताना देखील मी त्यांना समितीत सामावून घेतले. सर्व बैठका योग्यरित्या होतील. मागील अडीच वर्षाचा तपशील बघितला तर आम्ही रेकॉर्ड ब्रेक काम केले आहे”, असंदेखील राहुल नार्वेकर म्हणाले.