Rain : राज्यात पुढील चार दिवस पावसाचे, कोणत्या जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट
weather update and rain : राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आजपासून पुन्हा पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे.
पुणे, दिनांक 14 जुलै 2023 : देशभरात मान्सूनचा जोर चांगलाच सुरु आहे. उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. दिल्लीमध्ये यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. लाल किल्ल्यामध्ये पाणी शिरले आहे. हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरुच आहे. गेल्या दोन दिवस राज्यात काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. आता मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. राज्यातील पुढील चार-पाच दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
काय आहे हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत पुढील चार, पाच दिवस पाऊस पडणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे. मराठवाडा अन् इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु झाला आहे. गेले काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाचा पाऊस जोर वाढला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
पुढचे 4,5 दिवस राज्यात पावसाचे …☔☔कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भ काही ठिकाणी ?मुसळधार, मराठवाडा व इतर काही भागात? मेघगर्जनेसह पाउस. pic.twitter.com/jQms4F2WBz
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 13, 2023
मुंबईत पाऊस, पुणे विश्रांती
मुंबईत सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुणे शहरात पावसाचे वातावरण झाले असली तरी सर्वत्र पाऊस झालेला नाही. पुणे शहरातील उपनगरामध्ये काही ठिकाणी पाऊस झाला आहे.
धरणांमध्ये ३० टक्केच जलसाठा
जुलैचा पंधरवाडा लोटला तरीही राज्यातील धरणात अवघा ३० टक्केच जलसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणात सरासरी तब्बल १६ टक्के पाणीसाठा कमी आहे. मान्सून लांबल्याने आणि धरणक्षेत्रात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने राज्यातील धरणे केवळ ३० टक्केच भरली आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीने राज्याची चिंता वाढवली आहे.
पुणे विभागात सर्वात कमी जलसाठा
पुणे विभागातील धरणांत सर्वात कमी २० टक्केच जलसाठा आहे. औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये २४ टक्के तर अमरावती विभागात ४० टक्के जलसाठा आहे. नागपूर विभागात सर्वाधिक ४६ टक्के जलसाठा आहे. नाशिक विभागातील धरणांमध्ये २९ टक्के जलसाठा आहे. कोकण विभागातील धरणांमध्ये ५२ टक्केच पाणीसाठा आहे.
हतनूर धरणाचे 30 दरवाजे उघडले
हतनूर धरणाचे 41 पैकी 30 दरवाजे 1.50 मीटरने शुक्रवारी उघडले. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्यामुळे दरवाजे 1.50 मीटर उघडले आहे. धरणातून 95 हजार 351 क्युसेक्स प्रमाणे पाण्याचा विसर्ग तापी नदीत केला जात आहे.