नवीन वर्षात पावसाचा अंदाज, पुणे अन् कोकणात या आठवड्यात पाऊस
Rain and weather Update | यंदा पावसावर अल निनोचा प्रभाव होता. यामुळे देशातील अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला. आता पुन्हा नवीन वर्षांच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पुणे, दि. 1 जानेवारी 2024 | नवीन वर्षाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी चिंता निर्माण करणाऱ्या बातमीने झाली आहे. मागील वर्षभरात अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळीचे संकट आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सन २०२३ मध्ये पावसावर अल निनोचा प्रभाव होता. यामुळे पावसाने सरासरी गाठली नाही आणि निरोप घेतला. खरीप हंगाम चांगला आला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची आशा रब्बी हंगामावर होती. परंतु नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला. त्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. आता पुन्हा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
काय आहे अंदाज
पुणे परिसर आणि कोकणात बुधवारपासून पावसाचा अंदाज आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याचा परिणामामुळे हा पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रात गुरुवारपासून पावसाचे सावट असणार आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून थंडी कमी झाली आहे. पुणे शहरात तापमान वाढले आहे. पुण्यात रविवारी तापमानात १.७ अंशाने वाढ झाली. पुणे शहराचे तापमान १२.८ अंश सेल्सियस नोंदवले गेले. वातावरणातील या बदलाचा शेतीला फटका बसणार आहे. थंडी कमी झाल्याचा परिणाम रब्बी पिकावर होणार आहे. सध्या थंडी कमी झाली असली तरी धुके निर्माण होत आहे. यामुळे पिकांना कडक ऊन मिळत नाही.
काश्मीरमध्ये थंडीचे वाढली
महाराष्ट्रात थंडी कमी होत असताना काश्मीरमध्ये थंडीचा कडका कायम आहे. काश्मीरमधील अनेक ठिकाणी तापमान गोठणबिंदूच्या खाली आले आहे. रात्रीचे किमान तापमान वजा २.७ अंश सेल्सियसवरुन वजा ३.४ सेल्सियसवर पोहचले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहेलगामध्ये तापमान वाढले आहे. या ठिकाणी वजा ४.१ तापमान होते ते आता वजा ३.४ अंश सेल्सियस झाले आहे. काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाल्यामुळे थंडीची लाट अजूनही कायम आहे. सध्या काश्मीरमध्ये चिलाई कलान हा सर्वाधिक थंडीचा ४० दिवसांचा हंगाम सुरु आहे.