पुणे | 7 नोव्हेंबर 2023 : राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी गाठली नाही. सरासरी न गाठता मॉन्सूनने निरोप घेतला. त्याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे. राज्यातील अनेक प्रकल्प पूर्ण भरलेले नाहीत. यामुळे पुढील वर्षी जुलै महिन्यापर्यंत पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे. शेतात शेतकरी खरीप हंगामाची काढणी करण्यास लागला आहे. दिवाळीपूर्वी नवीन धान्य घरात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. पुणे हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवस हा पाऊस असणार आहे.
7 Nov, latest satellite obs at 8 am indicate partly cloudy sky over Kerala, Tamilnadu, coastal andhra, Karnataka and parts of South Maharashtra.
Possibility of light to mod spells at isolated places during next 3,4 hrs.
Watch for IMD updates please. pic.twitter.com/eAT3Jq4jDz— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 7, 2023
राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर तमिळनाडूवर वाऱ्याची चक्रीय परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आता दक्षिण – पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या केरळ किनारपट्टीलगत आहे. आठ नोव्हेंबर रोजी त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून मेघर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचवेळी राज्यातील अन्य भागात हवामान अशंत: ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.
कराडमधील पाटण तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. हा पाऊस रब्बी पिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पिके निघाली नाही, त्यांचे नुकसान होणार आहे. यावर्षी बहुतांश भागात खरीपातील मुख्य पीक सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. त्यामुळे रब्बी हंगामात चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांचा आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस नसल्यामुळे रब्बीतील पिकांच्या सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा नाही. यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट आहे. आता अवकाळीचे संकट आल्यामुळे शेतकरी कोंडीत अडकला आहे.