Rain | मान्सून सक्रीयनंतरही राज्यात पावसाची तूट कायम, आज कुठे दिला ऑरेंज अलर्ट
Rain update | राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून मध्यम स्वरुपाचा पाऊस आहे. शुक्रवारी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोण कोणत्या जिल्ह्यास दिलाय पावसाचा अलर्ट...
पुणे | 22 सप्टेंबर 2023 : राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. आठवडाभरापासून पाऊस पडत आहे. परंतु पावसाने अजूनही सरासरी गाठली नाही. सप्टेंबर महिना हा पावसाचा शेवटचा महिना म्हटला जातो. हा महिना संपण्यास आता आठ दिवस राहिले असताना राज्यात पावसाची तूट कायम आहे. राज्यात अजूनही ९ टक्के पाऊस कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्रात २० टक्के, तर मराठवाड्यात २४ टक्के पावसाची तूट आहे. पुणे विभागात 65.7 टक्केच पाऊस झाला आहे. यामुळे आता अजून दमदार पावसाची अपेक्षा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असणार आहे. दरम्यान शुक्रवारी हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे.
कुठे दिला आहे पावसाचा अलर्ट
हवामान विभागाने पावसाचा अलर्ट शुक्रवारी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यास दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दबाच्या पट्यामुळे पाऊस सक्रीय आहे. यामुळे गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. याठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील इतर सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. राज्यातील सोलापूर, नंदुरबार, सांगली जिल्हा वगळता इतर सर्व ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट आहे. यामुळे शुक्रवारी राज्यभरात दमदार पाऊस असणार आहे.
विदर्भात मुसळधार पाऊस
नागपूर परिसरात मुसळाधार पाऊस सुरु आहे. पुराच्या पाण्यात सहा टन मोसंबी वाहून गेली आहे. काटोल तालुक्यातील लाडगाव परसोडी शिवारात नाल्याच्या पुरात शेतकऱ्याची मोसंबी वाहून गेली आहे. सुभाष नासरे या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, रामटेक, बुटीबोरी परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू झाली. हा पाऊस भात पिकासाठी फायदेशीर आहे. पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे दर्यापूर तालुक्यातील थिरोली गावात नाल्याच्या काठावरील घरात पाणी शिरले. त्यामुळे ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. धुळे जिल्ह्यात पावसामुळे बंधारे भरले आहे. नदी, नाले भरुन वाहत आहे.