Rain : राज्यात पाच दिवस पावसाची बॅटींग, पुणे विभागात मुसळधार पावसाची शक्यता
IMD Weather forecast : ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर आता पाऊस सक्रीय झाला आहे. पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहे, असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला. राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पुणे | 4 सप्टेंबर 2023 : राज्यात पावसासंदर्भात हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. राज्यात पाऊस आता परतणार आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहे. राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे आणि परिसरात पुढील ४८ ते ७२ तासांत मुसळधार पाऊस होणार आहे. यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांनाही दिलासा मिळणार आहे.
कधीपासून परतणार पाऊस
सप्टेंबर महिना उजाडला आहे. त्यानंतर राज्यात पुरेसा पाऊस नाही. अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. परंतु आता परिस्थिती बदलणार आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे पाच सप्टेंबरपासून उत्तरपूर्व भारत, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होणार आहे. ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान कोकणातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रात ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
पुणे परिसरात मुसळधार पाऊस
पुणे परिसरात पुढील ४८ ते ७२ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडात आजपासून पावसाचा यलो अलर्ट पुढील चार दिवस देण्यात आला आहे. शनिवारी कोल्हापूर, रायगड, सातारा, पुणे जिल्ह्यात पाऊस झाला. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
लोणावळामध्ये विक्रमी पाऊस
लोणावळामध्ये शनिवारी विक्रमी पाऊस झाला. 105 मिमी पावसाची नोंद लोणावळामध्ये झाली. पिंपरी चिंचवडमध्येही 83 मिमी पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यातील माढा शहरासह परिसरातील गावात रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. चिपळूनमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. वर्धासह काही भागात जोरदार पाऊस बरसला. पावसाच्या आगमनाने पिकांना नवसंजीवनी मिळाली. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.