Rain : राज्यात आतापर्यंत कसा झाला पाऊस, कुठे कमी पडली सरासरी
Pune and Mumbai Rain : राज्यात मान्सूनचे आगमन होऊन दोन आठवडे झाले आहेत. परंतु राज्यात सर्वत्र मान्सून पुरेसा बरसलाच नाही. काही ठिकाणीच पाऊस झाला तर इतर ठिकाणी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे.
प्रदीप कापसे, पुणे : राज्यात बिपरजॉयमुळे यंदा मान्सून उशिराने दाखल झाला. नेहमी ७ जूनपर्यंत राज्यभरात पसरणारा मान्सून २५ जून रोजी राज्यात आला. त्यानंतर तो सर्वत्र बरसलाच नाही. काही ठिकाणी सरासरीइतका पाऊस झाला. यामुळे राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून देण्यात आली.
का कमी झाला पाऊस
यंदाच्या मोसमी पावसावर “एल निनो”चे सावट आहे. प्रशांत महासागरात एल निनो स्थिती निर्माण झाली आहे. एल निनोमुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. मात्र, हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, देशात सरासरी इतकाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यात आतापर्यंत कोकणात सरासरी इतका पाऊस झाला आहे. तसेच ८ ते १२ जुलै दरम्यान मान्सून पुन्हा कमकुवत असणार असल्याचे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुप कश्यप यांनी म्हटले आहे. परंतु १२ जुलैनंतर पुन्हा मान्सून सक्रीय होणार आहे. त्यानंतर तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
कुठे कमी झाला पाऊस
हिंगोली, अकोला, सांगली, जालनामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यानंतर चंद्रपूर, अमरावती, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर अन् जळगावमध्ये पावसाने सरासरी गाठली नाही. नागपूरमध्ये जवळपास आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर रविवारी पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली. जून महिन्यात विदर्भात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र त्यानंतर पाऊस झाल्याने पेरण्या करण्यात आल्या होत्या. परंतु पावसाने आठवडाभराची चांगलीच उसंत घेतल्याने शेतकरी चिंतेत झाला होता, मात्र रात्रीपासून पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी समाधानी आहे.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस
भंडारदरा , मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आता धो – धो पाऊस कोसळतोय. रविवारी या ठिकाणी पावसाचा जोर कायम होता. यामुळे भंडारदरा धरणाच्या जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत हे धरण ६० टक्के भरले आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या तीन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धबधबे प्रवाहीत झाले आहेत.