पुणे | 18 ऑगस्ट 2023 : खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे प्रचंड आक्रमक झाली आहे. मनसेने ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहेत. काही ठिकाणी तोडफोडही सुरू केली आहे. मनसेच्या या आंदोलनाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समर्थन केलं आहे. आमची मुलं रस्त्यावर उतरली आहेत. त्यांनी आक्रमक आंदोलनं सुरू केली आहे. ते स्वाभाविक आहे. मी त्याला काहीच करू शकत नाही, असं सांगतानाच नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे हडपसर येथे आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा हल्ला केला.
हे खड्डे काही पहिल्यांदा पडलेले नाही. गेल्या अनेक वर्षापासून पडत आहे. लोक त्यातून जात असतात. मला लोकांचं आश्चर्य वाटतं. जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देता ते खड्डे आणि इतर प्रश्न उभे करतात. त्यांनाच तुम्ही निवडून देता. प्रत्येकवेळी तुम्ही त्याच त्याच लोकांना निवडून देता. जातीच्या नावावर, कधी धर्माच्या नावावर तर अजून कोणत्या विषयावर. हे प्रश्न कधी सुटणार नाही. जोपर्यंत लोकांचा राग मतपेटीतून उतरणार नाही, तोपर्यंत रस्त्यावरचे खड्डे बुजणार नाहीत, असं राज ठाकरे यांनी निक्षून सांगितलं.
आजपर्यंत मनसेने अनेक विषयावर अनेकदा अनेक आंदोलने केली. पदरी काय पडलं? जे महाराष्ट्राचं नुकसान करतात त्यांना तुम्ही निवडून देता. याचं मला आश्चर्य वाटतं. आमचं आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत 16 ठिकाणी आंदोलनं झाली. मुंबई-गोवा रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. मुंबई-नाशिक रस्त्यावर आंदोलन होतील. त्यामुळे सरकारचे डोळे उघडतील. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करतील, असंही त्यांनी सांगितलं.
प्रत्येक ठिकाणी तोडफोड करण्याची गरज नाही. रस्त्यावरून गरोदर स्त्रिया जात असतात, लोकं जात असतात. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन करतानाच काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते आक्रमकपणे रस्त्यावर उतरतील. ते स्वाभाविक आहे. त्याला काही करू शकत नाही, असंही ते म्हणाले.
कायदा नावाची गोष्टच राज्यात राहिली नाही. निवडणुका कधी होणार? तर आम्हाला वाटेल तेव्हा होईल. यावर त्यांना प्रश्न विचारले जात नाही. राज्य सरकारमधील लोक येतात तेव्हा तुम्ही विचारत का नाही? असा सवाल त्यांनी केला.