Raju Shetti : ‘…म्हणून निर्माण केले जाताहेत वाद’; स्वाभिमानीच्या राजू शेट्टींची पुण्यातल्या कुरकुंभमध्ये केंद्र-राज्य सरकारवर टीका
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास राज्य व केंद्र सरकारला वेळ नाही. भारनियमन, महागाई, शेतीसाठी दिवसा वीज गायब, खते, डिझेल, पेट्रोल व गॅसच्या किंमतींमधील वाढ हे प्रश्न समोर आहेत. यावर कोणीही बोलायला तयार नाही, अशी टीका राजू शेट्टींनी केली.
कुरकुंभ, पुणे : जनतेच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी भोंगे, हिजाब, हनुमान चालिसा (Hanuman chalisa) व हिंदू-मुस्लीम असे वाद निर्माण केले जात आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Rajy Shetti) यांनी केली आहे. फी वाढीमुळे गरीबांच्या मुलांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे (Farmers) प्रश्न निर्माण झाले आहेत. तर पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाई यामुळे जनतेचे कंबरड मोडले आहे. हे सर्व बाजूला गेले असून केवळ भावनिक मुद्दे काढले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व परिस्थितीला केंद्र व राज्य सरकार जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी राज्यात बळीराजा हुंकार यात्रा काढण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील यात्रा संपून मराठवाडा, विदर्भ दौर्यावर रेल्वेने जात असताना ते बोलत होते.
‘जनतेचे जगणे झाले अवघड’
यावेळी शेट्टी म्हणाले, की शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास राज्य व केंद्र सरकारला वेळ नाही. भारनियमन, महागाई, शेतीसाठी दिवसा वीज गायब, खते, डिझेल, पेट्रोल व गॅसच्या किंमतींमधील वाढ हे प्रश्न समोर आहेत. यावर कोणीही बोलायला तयार नाही. यामुळे जनतेचे जगणे अवघड झाले आहे. शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न स्वाभिमानी मांडत असल्याने हुंकार यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे ते म्हणाले.
‘आमचे पाय जमिनीवर’
जिव्हाळ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी समाजात द्वेष निर्माण करणारे भोंगे, हनुमान चालिसा, हिजाब व हिंदू-मुस्लीम मुद्दे पुढे केले जात आहेत. ऊस एफआरपीचा प्रश्न आहे. राज्यात गळपाविना ऊस शिल्लक राहणे हे सरकारचे अपयश आहे. राज ठाकरेंच्या मराठवाड्यातील औरंगाबाद येथील सभेविषयी विचारले असता, आम्ही शेतकरी व जनतेचे प्रश्न मांडत असून आमचे पाय जमिनीवर आहेत. त्यामुळे कोणी काय करावे हा त्यांचा प्रश्न असल्याचे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.