पुणे : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्यावरील कारवाई मागे एक लाख एक टक्के रामदास कदम यांचाच हात असावा. कारण खेडच्या सभेनंतर रामदास कदम अस्वस्थ होते. त्यामुळेच त्यांनी वरिष्ठांना सांगून सदानंद कदम यांच्याविरोधात कारवाई घडवून आणली असावी, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
मला राजकारणाचा गंध नाही. मला राजकारण कळत नाही, असं आमदार योगेश कदम म्हणत आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मला राजकारणाचा गंध नाही. कारण योगेशच्या वडिलांनी 50 खोक्यांसाठी शिवसेनेशी गद्दारी केली. राजकारणाचा गंध नसल्याने मला तशी गद्दारी करता येत नाही. म्हणून जिथे काहीच मिळण्याची शक्यता नाही, अशा पक्षात मी काम करत आहे, असा चिमटा सुषमा अंधारे यांनी काढला. सदानंद कदमांना रामदास कदमांनाी आयुष्यातून उठवलं. 1 लाख 1 टक्के रामदास कदमांचाच सदानंद कदम यांच्यावरील कारवाईमागे हात आहे, असं अंधारे म्हणाल्या.
योगेश कदमांचा मतदारसंघ जाईल म्हणून ते तिकडे जाऊन बसले असतील. काहीतरी करा म्हणून विनवणी केली असेल. त्यामुळे या कारवाईत रामदास कदमांचाच हात आहे. रामदास कदमांना झोप येणार नाही कारण त्यांच मन त्यांना खात राहील, असं सांगतानाच खेडच्या सभेनंतर महाराष्ट्र भाजपाची आणि गद्दार गटाची गाळण उडाली आहे. आम्हाला गर्दी जमवायची गरज नाही. आम्ही जिथं उभं राहतो तिथं गर्दी होते. काल आशीर्वाद यात्रेत 500 चं लोक होती, असा दावाही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावरही टीका केली. आधी त्यांनी सांगितल की मराठा चेहरा होता म्हणून गद्दारी केली. आता म्हणतात की सट्टा लावून गद्दारी केली. म्हणजे गद्दारी केली हे तरी मान्य करत आहेत. मात्र टपरीवाल्याकडून या शब्दाशिवाय दुसऱ्या कोणत्या शब्दाचा वापर होईल काय अपेक्षा ठेवणार?, असा सवालही त्यांनी केला.