पुण्यात रॅपरची जाहीर माफी, गाणंही मागे घेतलं, नेमकं प्रकरण काय?
"माझ्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. चतुर्शिंगी पोलीस ठाण्याचे पीआय यांच्यासी मी बोललोय. त्यांनी सांगितल्यानुसार आणि गुन्ह्याप्रमाणे ते गाणं युट्यूबवरुन काढलं आहे. ते गाणं आता दिसत नाही. मी विद्यापीठाशी बोलून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करेन", अशी प्रतिक्रिया रॅपरने दिली.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) आवारात अश्लील भाषेत रॅप साँग बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. कारण विद्यापीठाची कोणतीही परवानगी न घेता अश्लील भाषेत रॅप साँग चित्रीत करणाऱ्या तरुणा विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तरुणाची शुक्रवारी पुणे पोलिसांकडून चौकशी देखील होणार आहे. या गाण्यात अश्लील भाषेचा वापर तसेच बंदूक आणि तलवार देखील दाखवण्यात आली होती. याच कारणावरून पुण्यातील चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात शुभम आनंद जाधव या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुभमची शुक्रवारी चौकशी देखील होणार होती. पण आता त्याने पुढे येत या सगळ्या गोष्टीवर स्पष्टीकरण दिलं आहे. याबाबत “मी रीतसर परवानगी मागितली होती. तरीही माझ्यावर कारवाई करण्यात येत असून मी माफी मागतो. तक्रार मागे घ्या”, अशी विनंती शुभमने केली आहे.
“माझ्याकडे कागदोपत्री परवानगी नव्हती. पण मी शूट करायला गेलो तेव्हा माझ्याकडे रितसर परवानगी होती. मी विद्यापीठाकडून फोनवरुन परवानगी मिळवली होती. माझ्या गाण्यात शिवीगाळ असेल याची कल्पना दिली नव्हती. विद्यापीठाने आरोप केलाय की, आमच्या परवानगीशिवाय चित्रीकरण केलं. तर ते आरोप खोटे आहेत. या आरोपांना आधार नाही. हे आरोप मी फेटाळून लावतो”, अशी प्रतिक्रिया शुभम जाधव या तरुणाने दिली आहे.
गाणं युट्यूबवरुन काढलं, पण…
“माझ्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. चतुर्शिंगी पोलीस ठाण्याचे पीआय यांच्यासी मी बोललोय. त्यांनी सांगितल्यानुसार आणि गुन्ह्याप्रमाणे ते गाणं युट्यूबवरुन काढलं आहे. ते गाणं आता दिसत नाही. मी विद्यापीठाशी बोलून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करेन. पण वाद मिटत नसेल तर ते गाणं डिलीट करण्यात काहीच अर्थ नाही. गाणं डिलीट करुन, मला आर्थिक नुकसान होत असेल, तसेच माझं नाव बदनाम होऊन वाद मिटत नसेल तर ते गाणं मी परत टाकेन. मग त्या प्रकरणाला वेगळंच वळण येईल”, अशा इशारा शुभम जाधवने दिला.
एकाच गाण्याला गुन्हा दाखल होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे गुन्हा दाखल होत नाही. गुन्हा दाखल झालाच तर कोर्टात भूमिका मांडणार असल्याचं त्याने म्हटलं. यावेळी शुभमच्या वकिलांनीदेखील भूमिका मांडली. “आम्हाल 41 ए प्रमाणे 16 एप्रिलला नोटीस मिळाली. त्यानंतर आम्ही 17 एप्रिलला पोलीस ठाण्यात हजरही झालो. आम्ही आमचं म्हणणंही मांडलं आहे. आम्ही तपास कार्याला सहकार्य करत असल्याने पोलिसांनी अटकही थांबवली आहे. तसेच ऑफेनसेस बेलेबल आहेत. खरंतर कायद्याच्या दृष्टीकोनाने पाहिलं तर हे ऑफेनसेसचा दावाच केला जाऊ शकत नाही. त्यामुळे हा व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे”, असा दावा वकिलांनी केला.
“याआधीही बरेचसे रॅपर्स, कलाकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून समाजातील इतर प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करत असतात. तसाच प्रयत्न या 25 वर्षाच्या तरुणाने त्याच्यात असलेल्या समजनुसार केला आहे. त्याने रितसर लेखी परवानगी मागितली होती”, अशी प्रतिक्रिया शुभमच्या वकिलांनी दिली.