पुणे: रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंग प्रकरणात (phone tapping case) आज पुणे पोलीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा जबाब नोंदवणार आहेत. अमजद खान या नावानं नाना पटोलेंचा फोन टॅप केल्याची माहिती आहे. एकनाथ खडसे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचेही फोन खोट्या नावांनी टॅप केल्याचं उघड झालं आहे. याच प्रकरणात आता पुणे पोलीस आज नाना पटोले यांचा जबाब नोंदवणार आहेत. त्यामुळे पटोले काय साक्ष देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाना पटोले यांनी सर्वात प्रथम फोन टॅपिंगच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी त्यांनी विधानसभेत आवाजही उठवला होता. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वी संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचाही जबाब नोंदवला होता. आज पटोले यांचाही जबाब नोंदवला जाणार असल्याने पटोले तपास अधिकाऱ्यांना कोणती माहिती देतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या प्रकरणी 6 एप्रिल रोजी एकनाथ खडसे यांचा कुलाबा पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला होता. त्यानंतर राऊत यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता. रश्मी शुक्ला राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी रश्मी शुक्लांवर फोन टॅपिंगचा आरोप केला होता. त्यानुसार रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काँग्रेस नेते नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख, बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आले होते. नाना पटोले यांनी या प्रकरणाचा सर्वप्रथम भांडाफोड केला होता. त्यानंतर विधानसभेतही त्यांनी या प्रकरणावर आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी समितीने याप्रकरणी आपला अहवालही दिला होता. सार्वजनिक सुरक्षे अंतर्गत सुरक्षेसाठी फोन टॅप करायची परवनगी दिली जाते. परंतु, या प्रकरणात फोन टॅप करण्याची कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. त्यामुळें ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी फोन कशासाठी टॅप केलें हे लवकरच समोर येईल, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मध्यंतरी स्पष्ट केलं होतं.