Rain : राज्यात गेल्या २४ तासांत या ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद
weather update and rain : राज्यात मान्सून चांगलाच सक्रीय झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरु आहे. पुणे अन् परिसरातही पावसाने चांगला जोर धरला आहे. आता पुढील काही दिवस पावसाचे असणार आहे.
रणजित जाधव, पुणे | 18 जुलै 2023 : यंदा मान्सून उशिराने दाखल झाला. राज्यात 24 जून रोजी मान्सून दाखल झाल्यानंतर काही दिवस पाऊस झाला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. आता गेल्या दोन, तीन दिवसांपासून राज्यात पावसाने चांगला जोर धरला आहे. तसेच पुढील काही दिवस पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे धरणांमधील जलसाठा वाढणार आहे. राज्यातील पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळ्यात गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.
लोणावळ्यात किती झाला पाऊस
पुण्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील विक्रमी पाऊस कोसळला आहे. गेल्या 24 तासांत या ठिकाणी तब्बल 214 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमात एका दिवसांत झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. परंतु यंदा आत्तापर्यंत झालेला पाऊल हा गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. मागील वर्षी 17 जुलैपर्यंत 2515 मिमी पाऊस बरसला होता, यंदा मात्र केवळ 1524 मिमी इतकाच पाऊस झाला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत 106 मीमी पाऊस झाल्याची नोंद कुलाबा वेधशाळेने दिली.
कळमोडी धरण शंभर टक्के भरले
खेड तालुक्यातील कळमोडी धरण 100 टक्के भरले आहे. पुणे जिल्ह्यातील पहिले धरण शंभर टक्के भरले आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे सांडव्यावरून आरळा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. कळमोडी धरणाची जलसाठ्याची क्षमता दीड टीमसी आहे. धरणातून विसर्ग सुरु झाल्यामुळे आरळा नदीकाठावरील नागरिकांनी खबरदारीचा इशारा दिला आहे. कळमोडी धरणातील पाणी चासकमान धरणात यायला सुरवात झाली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिले तर चासकमान धरण लवकरच भरणार आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात भीमाशंकर भागात पावसाची संततधार सुरू असल्यामुळे हे धरण पूर्ण भरले आहे.
पुण्यासाठी हे धरण महत्वाचे
पुणे शहराला पाणीपुरवठा चार धरणांमधून होता. त्यात टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांचा समावेश आहे. या धरणांत अजून 9.05 टीएमसी पाणी आहे. म्हणजेच 31.04 टक्के एवढा जलसाठा आहे. हा जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी आहे. मागील वर्षी 17 जुलैपर्यंत 60.62 टक्के जलसाठा झाला होता.