Pune : तुमचा पोपट त्रास देतो म्हणत तक्रारदारानं गाठलं थेट पोलीस स्टेशन! खडकीतल्या पोपट मालकावर ‘अदखलपात्र’ गुन्हा
अकबर अमजद खान यांच्यावर याप्रकरणी पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात भादंवि 504, 506 अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अदखलपात्र गुन्हा पोलिसांनी दाखल करून घेतला आहे.
पुणे : पोपट (Parrot) वारंवार शिट्ट्या मारतो आणि त्याचा त्रास आम्हाला होतो म्हणत पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोपटाच्या मालकावर खडकी पोलीस स्थानकात (Khadki police station) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकबर अमजद खान असे गुन्हा दाखल झालेल्या पोपटाच्या मालकाचे नाव आहे. अकबर खान यांचा पोपट फिर्यादी सुरेश शिंदे यांना बघून शिट्या मारत होता. हे वारंवार होत असल्याने अखेर चिडलेल्या शिंदे यांनी खान यांना तुमचा पोपट माझी झोपमोड करतो, मला त्याच्या शिट्टीचा त्रास होतो. तुम्ही त्याला दुसरीकडे ठेवा, असे अनेकदा सांगितले होते. परंतु फिर्यादी यांना पोपट मालकाने सहकार्य केले नाही. त्यामुळे पोपट मालकावर खडकी स्टेशनमध्ये भादंवि कलम 504, 506अन्वये गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे
नेमके काय घडले?
5 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता ही घटना घडली. तक्रारदार सुरेश अंकुश शिंदे (वय 72) त्यांच्या शेजारी राहत असलेल्या अकबर खान यांना तुमचा पोपट सारखा ओरडत असतो. तुमच्या पोपटामुळे आम्हाला त्रास होतो, तुम्ही तो दुसरीकडे कुठेतरी ठेवा, असे सांगितले. या कारणावरून पोपट मालकाने शिंदे यांना शिवीगाळ केली. तसेच तक्रारदारास मारण्याचीही धमकी दिली. त्यानंतर सुरेश शिंदे यांनी या कारणावरून थेट खडकी पोलीस स्टेशनच गाठले आणि आपल्यावर घडलेला प्रसंग सांगितला.
अदखलपात्र गुन्हा दाखल
अकबर अमजद खान यांच्यावर याप्रकरणी पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यात भादंवि 504, 506 अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अदखलपात्र गुन्हा पोलिसांनी दाखल करून घेतला आहे. अकबर खान आणि सुरेश शिंदे हे दोघेही महात्मा गांधी वसाहत, तुळशी मार्केट शेजारी, शिवाजीनगर इथे एकमेकांच्या शेजारी राहतात. मात्र पोपटाच्या कारणावरून आता या दोघांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
परस्पर सामंज्यस्याने मिटणार वाद की चिघळणार?
सध्या पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला असला तरी पोलीस नेमकी काय कारवाई करतात, या दोन्ही शेजाऱ्यांचा वाद परस्पर सामंज्यस्याने मिटतो की चिघळतो, पोपटाचा मालक पोपटाला सोडून देतो की काही पर्यायी व्यवस्था करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.