सहा ठिकाणी एकाच वेळी ईडीच्या धाडी; रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर धाड पडली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी बारामती अॅग्रो कंपनीच्या सहा ठिकाणांवर धाड मारली आहे. यात पुणे, बारामतीसह संभाजीनगरातील कार्यालयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रोहित पवार परदेशात असताना ही धाड मारण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या धाडीवर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यकत् होत आहेत.
योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 5 जानेवारी 2023 : नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने सकाळीच छापेमारी केली आहे. एक दोन नव्हे तर बारामती अॅग्रोच्या सहा ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. सहा तासांपासून ईडीचे अधिकारी कार्यालयातील कागदपत्रांची छाननी करत आहेत. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीमुळे राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे रोहित पवार यांचे काका अजित पवार हे सत्तेत आहेत. असं असतानाही ईडीने थेट पवार घराण्यातच हात घातल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं असून या छापेमारीवर रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
रोहित पवार हे परदेशात गेलेले आहेत. ते परदेशात असतानाच ईडीने ही छापेमारी केली आहे. छापेमारी झाल्याचं कळल्यानंतर रोहित पवार यांनी महापुरुषांचे फोटो पोस्ट करत ट्विट केलं आहे. हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला… अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल, असं सूचक ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. सध्या रोहित पवार यांच्या या ट्विटची चर्चा सुरू आहे.
सात तासांपासून झाडाझडती
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर या कंपन्यांच्या सहा ठिकाणच्या कार्यालयावर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता ही छापेमारी करण्यात आली. सात तास झाले तरी अजूनही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कंपनीत झाडाझडती सुरू आहे. पुणे, बारामती, पिंपळी आणि संभाजीनगरसहीत सहा ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही छापेमारी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कागदपत्र तपासणे सुरू
रोहित पवार हे बारामती अॅग्रोचे सीईओ आहेत. त्यांचं बारामती आणि हडपसर येथे कार्यालय आहे. या दोन्ही ठिकाणी ईडीचे अधिकारी ठाण मांडून आहेत. अधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची छाननी केली जात आहे. बँकेचा तपशीलही तपासला जात असून संगणकातील फोल्डरही पाहिले जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा… ज्यांनी पिढ्यान् पिढ्या #महाराष्ट्र_धर्म जपला आणि वाढवला… अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने… pic.twitter.com/eBMxFe9Sj4
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 5, 2024
तक्रारी आल्यावर छापेमारी होत असते
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या छापेमारीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या काही तक्रारी असतात त्यानुसार छापेमारी होत असते. कुणाचीही तक्रार आली की त्यावर तपास होतो. महाविकास आघाडीच्या काळात आमच्याही चौकश्या झाल्या. चौकश्या होत असल्याने घाबरून जायचं नसतं. ज्यांच्यावर छापे पडले त्यांनी योग्य कागदपत्रे दिली आणि मांडणी केली तर पुढे काही होत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
आपलेच घरभेदी यात सामील
या छापेमारीवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमधून प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ED ची धाड पडल्याची बातमी समजली. पवार साहेबांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याचं हे फळ आहे. वाईट याचेच वाटते की, यात आपलेच “घरभेदी” सहकारी सामील आहेत. परंतु मला विश्वास आहे की, रोहित या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाहीत, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडतील, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.