बारामती | 15 मार्च 2024 : लोकसभा निवडणुका उद्या शनिवारी जाहीर होणार आहे. यासाठी अनेकांनी आपला प्रचार सुरु केला आहे. परंतु सध्या राज्याचे लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागले आहे. या मतदार संघात नणंद आणि भावजय यांच्यात लढत होणार आहे. पवार कुटुंबातील खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. यामुळे ही लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होण्याऐवजी पवार विरुद्ध पवार होणार आहे. या लढतीसाठी पवार कुटुंबीय शरद पवार यांच्या पाठिशी असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांनी एका भाषणात त्याचा उल्लेखही केला होता. आता पवार कुटुंबातील आणखी दोन जण सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे.
पवार कुटुंबातील आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार करत आहेत. तसेच रोहित पवार यांच्या बहीण सई पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारात उतरल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीचा प्रचार केला. अजित पवार यांचे चुलत बंधू राजेंद्र पवार यांच्या सुनंदा पत्नी तर सई मुलगी आहे.
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीत त्यांच्या पक्षाचा बुथ कमिटी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात अजित पवार भावनिक झाले होते. परिवारात आपणास एकटे पाडण्यात येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त मांडली होती. बारामतीमध्ये मी आणि माझा घरातील मंडळी सोडली तर सर्व माझ्या विरोधात प्रचार करतील. माझ्या परिवारातील सर्व माझ्या विरोधात आहेत. परंतु मला तुमची साथ आणि पाठिंबा आहे. तुम्ही सोबत असेपर्यंत माझे काम चालणार असल्याचे अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले होते.
सुप्रिया सुळे यांचा इंदापूरमध्ये मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा अजित पवार गटाला दिला. कोणाचा फोन आला तर सांगा की आधी सुप्रिया ताईशी बोला, किंवा त्यांना माझा नंबर द्या, मी बोलते. भाजप आणि राष्ट्रवादीमधील नेते धमकी देत आहेत ? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? असा टोला अजित पवार गटाला सुप्रिया सुळे यांनी लगावला.