Rohit Pawar | पवारसाहेबांची ती स्टाईलच, रोहित पवार असे का म्हणाले…
Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील आमदार रोहित पवार सध्या जोरदार बॅटींग करत आहे. विविध माध्यमातून ते आपली भूमिका सातत्याने मांडत असतात. सोशल मीडियावर ते चांगलेच सक्रीय असतात. आता शरद पवार यांच्या त्या भेटीबद्दलही ते बोलले....
पुणे | 26 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार शरद पवार गटाची बाजू जोरदारपणे मांडत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विविध विषयांवर बोलत असतात. अगदी अजित पवार यांनाही ते सोडत नाहीत. त्यांनी मंगळवारी विविध विषयांवर भूमिका मांडली. कंत्राटी भरतीपासून शरद पवार यांच्या त्या चर्चित भेटीवर त्यांनी मत मांडले. तसेच बारामतीमध्ये लोकसभेचा उमेदवार कोण असणार? हे ही स्पष्ट सांगितले. तसेच एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात त्यांनी रोखठोक मत मांडले.
कंत्राटी भरतीचा निर्णय…
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंत्राटी भरतीचा निर्णय घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, आघाडी सरकारने घेतलेला हा निर्णय हा फक्त कामगार विभागापुरता मर्यादित होता. आता हा निर्णय सगळ्या विभागांना लागू करण्यात आलाय. गेल्या सरकारच्या काळात झालेल्या या निर्णयाचे समर्थन करत नाही, हे त्यांनी स्पष्ट केले.
बारामतीत कोण असणार उमेदवार
कल्याण लोकसभेसंदर्भात रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे आले. त्यांच्या नावानेच सर्व्हे झाला आहे. यामुळे श्रीकांत शिंदे आणि आमदारांचे वाद आपण पाहिले असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. बारामतीमधील चर्चेवर विश्वास ठेऊ नका. भाजपसोबत जे गेले आहेत, ते त्यांचा उमेदवार ठरवतील. परंतु आमचा उमेदवार ठरला आहे. सुप्रिया सुळेच बारामतीमधूलन लढवणार आहे. त्या शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
आमच्याबरोबर कोणी नाही, पण भीती नाही
शरद पवार साहेबांनी यापूर्वीच सांगितलय, माझ्यासोबत शून्य आमदार आहेत. परंतु आम्हाला भीती नाही. आम्ही साहेबांचे कार्यकर्ते म्हणून काम करणार आहोत. कदाचित आता दुसऱ्या बाजूला भीती वाटत असावी, असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार गटाला नाव न घेता लगावला. एकनाथ शिंदे यांनी प्रतिमा सुधारण्यासाठी एक एजन्सी नेमली असल्यावर रोहित पवार म्हणाले एजन्सी नेमून काय उपयोग, आधी वृत्ती आणि नीती बदला, मग छबी सुधारा.
अदानी- पवार भेटीवर काय म्हणाले
शरद पवार यांनी नुकतीच उद्योगपती गौतम अदानी यांची भेट घेतली होती. त्यावर बोलताना रोहित पवार यांनी मोजक्या शब्दांत मत मांडले. त्यात विशेष काय ? पवार साहेबांची ती स्टाईल आहे आणि ते त्यांची स्टाईल बदलत नाहीत.