पार्थ पवार राज्यसभेवर?, रोहित पवार यांची भावावर पहिल्यांदाच टीका; म्हणाले, विचारवंत…
राज्यातील राज्यसभेच्या सहा रिक्त जागांवर निवडणुका होणार आहेत. भाजपने अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि विदर्भातील भाजपचे जुने कार्यकर्ते गोपाल गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिंदे गटाने मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचं घटत आहे. त्यावर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 14 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी कंबर कसली आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत राज्यसभेच्या उमेदवारीवर चर्चा झाली. पण कोणताच निर्णय झाला नाही. सुनील तटकरे, समीर भुजबळ यांच्यासह पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी पार्थ पवार यांचं नाव सर्वात आघाडीवर होतं. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा कानावर येताच शरद पवार गटाचे नेते, आमदार आणि पार्थ पवार यांचे सख्खे चुलत बंधू रोहित पवार यांनी पार्थ यांच्यावर टीका केली आहे. रोहित यांनी पार्थ यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली आहे.
रोहित पवार यांनी पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीच्या चर्चेवरून उपरोधिक टीका केली आहे. राज्यसभेवर अभ्यासू लोकांना पाठवलं जातं. पार्थ पवार हे त्या पद्धतीचे उमेदवार आहेत. एखादा विचारवंत राज्यसभेवर गेल्याने जर राज्याचा आणि देशाचा फायदा होईल असं जर अजित पवारानं वाटत असेल तर ते पार्थ यांना पाठवतील. हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
विलीनीकरणाची चर्चा नाहीप
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्ष विलीन करण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. कोणी तरी नेता येतो आणि काहीही सांगतो. आम्ही बैठकीत होतो. तिथे अशी कोणतीच चर्चा झाली नाही. आम्ही शरद पवार यांच्यामुळेच निवडून आलो आहोत. त्यामुळे सत्ता नसताना त्यांना सोडणं योग्य नाही. नाही तर आम्हाला आमच्या घरचेही माफ करणार नाहीत, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. तर देवेंद्र फडणवीसांवर बोलून वेळ घालवायचा नाही. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
जयंत पाटील यांचाच व्हीप लागू
महाविकास आघाडीच्या बैठका, कार्यक्रम, दौरे याबाबत आजची बैठक होती. नियोजनाशी संबंधित चर्चा आजच्या बैठकीत झाली. मात्र, राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची नाहक चर्चा करण्यात आली. ऐकीव माहितीवर ही बातमी करण्यात आली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. जयंत पाटील यांचा व्हीप आम्हाला लागू होणार आहे. मराठा आरक्षणावर भाजप काहीही निर्णय घेत नाही. उलटपक्षी गुणरत्न सदावर्ते सारखे लोक मराठा आरक्षणाला विरोधच करत आहेत, असं ते म्हणाले.