एक फोटो ट्विट करत रोहित पवार यांच्या निशाण्यावर आले तिघे, भाजप, शिंदे गट अन् अजित पवार
Pune News : राज्यातील सध्याच्या बदललेल्या राजकारणावर रोहित पवार अधूनमधून वक्तव्य करत असतात. आता त्यांनी एका फोटोचा आधार घेऊन ट्विट केले आहे. त्यावरुन चांगली चर्चा सोशल मीडियात सुरु झालीय.
योगेश बोरसे, पुणे, दिनांक 15 जुलै 2023 : गेल्या पंधरा दिवसांत राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. पंधरा दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याबरोबर असलेले अजित पवार यांनी बंड केले. त्यांनी जवळपास ४० आमदारांसह भाजप अन् शिवसेना युतीची साथ धरली. राज्यातील सरकारमध्ये ते सहभागी झाले. त्यानंतर त्यांच्यासह नऊ जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. आता रखडलेली खातेवाटप जाहीर झाली. राज्यातील या बदललेल्या परिस्थितीवर आमदार रोहित पवार यांनी उपहासात्मक टीका केली आहे. यासाठी त्यांनी एका फोटोचा आधार घेतला आहे.
काय म्हटले रोहित पवार यांनी
लोणावळ्यातून जाणारे हे अवाढव्य रेल्वे इंजिनामुळे भाजपाची आठवण झाली. ही गाडी स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणते. तसेच इतर प्रवाशांनाही पुढे जाऊ देत नाही. रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे, परंतु ते रस्त्यावर आले आहे. या रेल्वे इंजिनिचा मार्ग चुकला आहे. त्याला स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून जाण्याची वेळ आली आहे.
या रेल्वे इंजिनाप्रमाणे भारतीय जनता पक्षानेही राजकारणासाठी चुकीचा मार्ग निवडलाय. आता या इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाणे येथील आहे का? या ट्रकची चेसी बारामतीलाच तयार झाली आहे का?, हे मात्र तपासावे लागेल, या आशयाचे कॅप्शन रोहित पवार यांनी फोटोला दिले आहे. या एका फोटोतून त्यांनी भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार या तिघांना लक्ष्य केले आहे.
लोणावळ्यात ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली… स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना… खरंतर रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर… आणि मार्ग चुकला तर स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या… pic.twitter.com/itZ6Gq4jmy
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 15, 2023
रोहित पवार यांच्या ट्विटला व्हायरल
रोहित पवार यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. अनेकांनी ते रिट्विट केले आहे. अनेकांनी लाईक केले आहे. काहींनी कॉमेंट व्यक्त केल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, एका शब्दात सारांश..अनेकांनी रोहित पवार यांना ट्रोलसुद्धा केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, हा रस्ता भाजपच्या नितीन गडकरी साहेबांच्या पुढाकाराने झालेला आहे हे लक्षात ठेवा. म्हणूनच त्या रस्त्यावरून इंजिन नेणे शक्य झाले…