Pandharpur Wari : यंदाची वारी आरोग्यवारी! महिलांसाठी असणार विशेष सुविधा, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
पालखी ज्या ज्या ठिकाणी थांबणार आहे, त्या ठिकाणी न्हाणीघर आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ 19 जूनला दुपारी बारा वाजता निवडुंगा विठोबा मंदिर नाना पेठ येथे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
पुणे : यंदाची वारी ही आरोग्यवारी असणार आहे. राज्य महिला आयोगाकडून (Maharashtra State Commission for Woman) तीन जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. महिलांना सॅनिटरी नॅपकीन, वेंडिंग मशिनची सुविधा दिली जाणार आहे. आरोग्य वारीचा उद्या पुण्यात शुभारंभ होणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, की मागील महिनाभरापासून पुणे, सातारा, सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून आरोग्यवारीचे नियोजन केले आहे. या वारीत (Wari) प्रथमच महिलांसाठी अशी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासोबतच स्त्री-रोग तज्ज्ञ, स्तनदा मातांसाठी विसावा कक्ष या सर्वांचे नियोजन करण्यात आले आहे. दर दहा ते पंधरा किलोमीटरवर ही व्यवस्था करण्यात आली आहे, असे चाकणकर म्हणाल्या.
महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजन
पालखी ज्या ज्या ठिकाणी थांबणार आहे, त्या ठिकाणी न्हाणीघर आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ 19 जूनला दुपारी बारा वाजता निवडुंगा विठोबा मंदिर नाना पेठ येथे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेबरोबरच महिलांच्या आरोग्यासाठीचे नियोजन या आरोग्यवारीत करण्यात आले आहे. या गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा मिळण्याच्या दृष्टीनेही नियोजन केल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा
21 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान ठेवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या आळंदीत लगबग सुरू झाली आहे. वारी 9 जुलैला पंढरपुरात पोहोचणार आहे. आषाढी एकादशी 10 जुलैला आहे. या सोहळ्यानिमित्त आळंदीत वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. वारीत महिलांसाठी तर विशेष सुविधा असणारच आहेत. त्यासह वारकऱ्यांसाठीही आरोग्य पथक, सॅनिटायझेशन आदी सुविधा असणार आहेत. आळंदी, देहू याठिकाणीही सध्या आरोग्य विभागाकडून डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. याठिकाणी वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत. कोणताही वैद्यकीय त्रास वारकऱ्यांना झाल्यास या पथकातील डॉक्टरांमार्फत उपचार केले जाणार आहे. त्याशिवाय रुग्णवाहिकादेखील उपलब्ध असणार आहे.