Sada Sarvankar : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मनोहर जोशी यांचं घर जाळायला लावलं; सदा सरवणकर यांचा गंभीर आरोप
शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्या गंभीर आरोप केला आहे. कोल्हापुरात एका मेळाव्यातून त्यांनी हा आरोप करताना उद्धव ठाकरे यांची खेळीच उघड केली आहे.
कोल्हापूर | 11 सप्टेंबर 2023 : आमदारकीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मला मनोहर जोशी यांचं घर जाळायला सांगितलं होतं, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी केला आहे. सरवणकर यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात एका सभेला संबोधित करताना सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे यांची पोलखोल केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करतानाच त्यांनी मनोहर जोशींविरोधात कसे षडयंत्र रचले याचा पर्दाफाशही केला. तर, सदा सरवणकर यांना हे सर्व बोलायला 25 वर्ष का लागली? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
मला उमेदवारी नाकारणं लोकांच्या पचनी पडणार नव्हतं. म्हणूनच एक कुटील डाव रचून सरांच्या घरावर हल्ला करायला लावणं, घर जाळा म्हणून सांगणं ही कुटील रणनीतीचा भाग होता. ते जिव्हारी लागलं. त्यावेळी शिवसैनिकांमध्ये उद्रेक झाला होता. मनोहर जोशींच्या घरावर हल्ला झालेला असतानाही त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे, असं सदा सरवणकर यांनी सांगितलं.
ताकद दाखवावी लागेल
मनोहर जोशी हे माझे गुरू होते. माझी उमेदवारी नाकारण्यात आली. मला मातोश्रीतून तसं सांगण्यात आलं. उमेदवारी दुसऱ्याला देण्यात येणार असल्याचं कळल्यानंतर मी त्याची माहिती मनोहर जोशींना दिली. तसेच आता काय करू? असा सवाल मी मनोहर जोशींना केला. त्यावर सदा तुला तुझी ताकद दाखवावी लागेल, असं मनोहर जोशी म्हणाले.
त्यानुसार मी 3 ते 4 हजार शिवसैनिक घेऊन मातोश्रीवर गेलो. तेव्हा उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर बसले होते. तूच निवडून येऊ शकतो. तूच आमचा उमेदवार असू शकतो. पण तुला उमेदवारी देता येत नाही, असं म्हणून उद्धव ठाकरे निघून गेले, असं सदा सरवणकर म्हणाले.
मिलिंद नार्वेकर म्हणाले…
माझी उमेदवारी का नाकारली? याचं कारण मला कळलं नाही. मिलिंद नार्वेकर खाली बसले होते. त्यावेळी मिलिंद नार्वेकर यांना इंटरकॉमवर फोन आला. फोनवर हो हो ना ना झालं. त्यानंतर नार्वेकर म्हणाले, तुझी उमेदवारी मनोहर जोशींनी कापली आहे. आता तू शिवसैनिक आणले ते मनोहर जोशींच्या घरी घेऊन जा. तेव्हा मी शिवसैनिकांना सांगितलं आपल्याला मनोहर जोशींच्या घरी मोर्चा न्यायचा आहे. तिथून निघालो, असं सरवणकर यांनी सांगितलं.
राऊत म्हणाले, जाळून टाका
तीन मिनिटाच्या अंतरावर आलो. तेव्हा संजय राऊत यांचा फोन आला. सदा तू चाललाय कुठे? असं राऊत यांनी विचारलं. मनोहर जोशींच्या घरी चाललोय हे राऊत यांना कसं सांगू? असा माझ्या मनात विचार आला आणि मी त्यांना वेडंवाकडं काही सांगितलं. त्यावर राऊत म्हणाले, अरे तू मनोहर जोशींच्या घरी मोर्चा घेऊन चाललाय ना? राऊत यांचा हा प्रश्न येताच मातोश्रीतून राऊत यांना माहिती दिली असेल हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मग खोटं बोलण्यात अर्थ नव्हता. मी ताबडतोब त्यांना सांगितलं, हो चाललोय सर.
ते म्हणाले, अरे तू असा जाऊ नकोस. जाळून टाक त्यांचं घर. काही शिल्लक ठेवू नको. बाजूला पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोलपंपवरून पेट्रोल घ्या. आणि घराला आग लावून टाका. आपण वेडे शिवसैनिक. हा मातोश्रीचा आदेश आहे. आदेश आल्यावर गुरु वगैरे काही बघत नाही. मी कार्यकर्त्यांना सांगितलं पेट्रोल घ्या आणि मनोहर जोशींच्या घरात जा, असं सरवणकर म्हणाले.
जोशींच्या घरी शिवसैनिक
तिथे गेल्यावर मनोहर जोशींच्या घरात 15 ते 20 शिवसैनिक होते. जोशींच्या घरात कधीच शिवसैनिक नसतात. पण त्या दिवशी होते. चॅनलवालेही तिथे आले होते. कॅमेरे लागलेले होते. मला वाटलं यायला सात मिनिटं झाली. एवढी तयारी झाली कशी? तरीही मुलांना सांगितलं घर जाळावे लागेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
पुन्हा उमेदवारी नाकारली
त्याच दिवशी दुपारी मला नार्वेकरांचा फोन आला. अरे तू व्यवस्थित केलं. चांगलं केलं. उद्या 11 वाजता ये. तुझी उमेदवारी फायनल होत आहे. सकाळी 11 वाजता मातोश्रीवर गेलो. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बसलेले होते. उद्धव ठाकरे यांनी माझ्यासमोर पेपर फेकले. सदा सरवणकर यांचा मनोहर जोशींच्या घरावर हल्ला, अशी हेडिंग सर्वच पेपरला होती.
उद्धव ठाकरे म्हणाले, अरे पेपरला छापून आलं. तू निवडून कसा येणार? मी म्हटलं तुम्हीच सांगितलं म्हणून हल्ला केला. तुमचा आणि संजय राऊत यांचा आदेश होता. तुम्ही मला तिकीट द्या, मी निवडून येणार. पण उद्धव ठाकरे यांनी तिकीट देण्यास नकार दिला. त्यांनी नाही म्हणून सांगितलं आणि उमेदवारी नाकारली. जाळ्यात अडकवायचं आणि उमेदवारी नाकारायची हे काम बाळासाहेबांनी केलं नाही. ते उद्धव ठाकरे यांनी केलं, अशी टीका त्यांनी केली.
दसरा मेळाव्यात दिसता कामा नये
सरवणकर यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे, असं मनोहर जोशींना वाटायचं. एका मेळाव्यात मनोहर जोशी म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राचं भलं होईल. जोशींच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांना राग आला. त्यांनी मला मातोश्रीवर बोलावलं आणि मनोहर जोशी दसरा मेळाव्यात दिसता कामा नये. व्यासपिठावर दिसता कामा नये असे आदेश दिला. दुसऱ्या दिवशी नार्वेकर घरी आले. त्यांनी ही तेच सांगितलं आणि पुढचं रामायण घडलं, असं त्यांनी सांगितलं.