मनोज गाडेकर, शिर्डी, अहमदनगर : शिर्डी येथील साई मंदिरात देशभरातून भाविक येत असतात. यामुळे या ठिकाणी नेहमी भाविकांची गर्दी असते. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान शिर्डीतील साई मंदिर झाले आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याचे काम मंदिर प्रशासन करत आहे. यामुळे भाविकांचे दर्शन सुलभ होऊ लागले आहे. त्याचवेळी देशभरातून शिर्डीत येणाऱ्या भाविकांची फसवणूक होऊ नये, यासाठी पोलिसांनीही पावले उचलली आहे. शिर्डी पोलिसांनी यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे.
शिर्डीला साईबाबा यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांची लूट होऊ नये, यासाठी शिर्डी पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. भाविकांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. साईमंदिर परिसरातील प्रसाद विक्रेत्यांवर निर्बंध आणले. सर्व व्यावसायिकांना प्रसाद आणि शालच्या किंमतीचे फलक लावण्याची सक्ती केली. यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच या निर्णयामुळे मंदिर परिसरात असणाऱ्या दलालांवर वचक बसला आहे.
मागील दोन ते तीन महिन्यांपासून तब्बल एक हजार दलांलवर पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते. या कारवाईचा प्रसाद विक्रेत्या व्यावसायिकांनी धसका घेतला. विक्रेत्यांनीही प्रसाद विक्रीच्या किंमतीबाबत दुकानावरील दर्शनी भागात दरपत्रक लावले आहेत. दर निश्चित झाल्यामुळे भाविकांची लूट थांबणार असल्याने भाविकांनी या निर्णयाच स्वागत केले आहे.
प्रसाद खरेदीच्या वेळी साईभक्तांची लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने पोलिसांनी गोपनीय पथके तयार केली. फसवणूक करणाऱ्या दलालांवर गुन्हे दाखल केले. ही कारवाई नियमित सुरु असल्यामुळे भाविकांच्या फसवणुकीचे प्रमाण कमी झाले. पोलिसांच्या या निर्णयास व्यावसायिकांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. आता दुकानदारांनी आपल्या दुकानांवर दरपत्रक लावले आहेत. मंदिर परिसरात फिरणाऱ्या कुठल्याही एजंटच्या अमिषाला बळी न पडण्याच आवाहन शिर्डी पोलिसांनी केले आहे. यामुळे आता शिर्डीत भाविकांची फसवणूक होणार नाही.