Special Report : वादग्रस्त विधान, शाईफेक आणि राजकीय खळबळ, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत असं का घडलं?
भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाई फेकण्यात आलीय. महापुरुषांनी सुरु केलेल्या शाळा संदर्भातल्या वक्तव्यावरुन ही शाईफेक झालीय. पिंपरीत घडलेल्या या घटनेनंतर चंद्रकांत पाटलांनी संताप व्यक्त केलाय. भाड्याचे लोकं लावून टार्गेट केलं जात असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय.
पुणे : पिंपरीत मंत्री चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यांवरच शाई फेकण्यात आली. “महापुरुषांनी भिक मागून शाळा स्थापन केल्या, मग तुम्ही सरकारच्या अनुदानावर अवलंबून का?”, अशा त्यांच्या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटील यांना टार्गेट करण्यात आलं. आपल्या नियोजित कार्यक्रमानिमित्त चंद्रकांत पाटील पिंपरीत आले होते. त्याचवेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांवर शाई फेकली.
ही शाईफेक झाली त्यावेळी पोलिसांची सुरक्षा चंद्रकांत पाटील यांच्या अवतीभवती होतीच. पण असं काही होईल याचा अंदाज कोणालाही नव्हता.
कार्यक्रमासाठी चंद्रकांत पाटील निघत असतानाच, समता परिषदेच्या कार्यकर्ता समोरुन आला आणि त्यानं थेट चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावरच शाई फेकली.
चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी दिलगिरीही व्यक्त केली. पण तरीही चंद्रकांत पाटलांवर शाईफेक झाली.
आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला. तरीही दिलगिरी व्यक्त करुनही शाईफेक झाल्यानं चंद्रकांत पाटलांनी आता संताप व्यक्त केलाय.
शाळेच्या अनुदानावरुन बोलताना उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी जो भीक शब्द वापरला, त्यावरुन महाविकास आघाडीचे नेते पाटलांना टार्गेट करतायत.
शाईफेक होण्याआधी पुण्यात NSUI च्या विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटलांना काळे झेंडे दाखवले होते. पण पिंपरीत येईपर्यंत प्रकरण शाईफेकपर्यंत पोहोचलं.