राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही, संभाजी ब्रिगेडचा पहिला वार
Raj Thackeray | राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे
पुणे: राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्यापलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेकडून करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचे वक्तव्य केले होते. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रसेच्या उदयानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा थेट आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांचा समाचार घेतला.
राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे, अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.
हा संघर्ष उभा करत असताना त्यांना 1899 ते 1999 या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा राज ठाकरे यांना विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की, असेही प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता या टीकेला ‘मनसे’कडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते.
संबंधित बातम्या:
Special Report | पवारांनी जातीचं विष पेरलं, राज ठाकरेंच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक
बाबासाहेब पुरंदरेंवर इतिहासकारांचा ‘दंतकथे’चा आरोप, राज ठाकरेंचं पहिल्यांदाच थेट उत्तर
Video : ‘या वयातही आशाताई काय दिसतात ना!’, राज ठाकरेंकडून सौंदर्याचं कौतुक