पुणे: कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढणार आहे. ही जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला सोडण्यात आली नाही. मात्र, असं असलं तरी कसब्याच्या निवडणुकीत आता नवा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाचे मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची कोंडी होण्याची शक्यता आहे. संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटासोबत युती आहे. त्यांचा महाविकास आघाडीत समावेश नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने या निवडणुकीत उमेदवार दिला असल्याचं सांगितलं जात असून त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.
संभाजी ब्रिगेडही कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मोहिते आज उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कसब्याची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वीच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेसोबत युती केली होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीत येईल अशी चर्चा होती. परंतु, ब्रिगेडचा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. त्यामुळे संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.
संभाजी ब्रिगेडपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीही कसब्यासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. कसब्याची जागा लढायची की नाही याबाबत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आज निर्णय घेणार आहेत. वंचितनेही नुकतीच ठाकरे गटासोबत युती केली आहे.
वंचितचा अजूनही महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. त्यातच शिवसेना कसब्याची निवडणूक लढवत नाहीये. त्यामुळे वंचितने ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना फोन करून कसबा आणि चिंचवडमधून उमेदवार न देण्याची विनंती केली आहे. लोकप्रतिनिधीचं निधन झाल्याने होणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची परंपरा आहे. ती पाळली गेली पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी आंबेडकरांकडे व्यक्त केली आहे.
तर, सात-आठ महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार देऊ नका, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंबेडकरांना केलं आहे.