पुणे : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अनपेक्षित अशी घटना घडली. आळंदीत संत ज्ञानेश्वर यांच्या पालखी प्रस्थानच्या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी मंदिरात प्रवेश करण्यावरुन मोठा वाद उफाळला. यावेळी पोलिसांनी अनेक वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखलं होतं. संबंधित घटना ही काल (12 जून) घडली. पालखी सोहळ्याचा तो पहिला दिवस होता. पण पहिल्याच दिवशी पालखी सोहळ्याला गालबोट लागलं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेला प्रस्थान करत असताना हा प्रकार घडला. या घटनेवरुन आता राजकारण उफाळून आलंय. विरोधकांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाल्याचा आरोप केलाय. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप फेटाळला आहे.
दुसरीकडे पोलिसांकडून आळंदीत घडलेल्या घटनेचा आणखी एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. तर काही वारकऱ्यांनी आपल्याला एका खोलीत डांबून पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या सगळ्या घटानाक्रमाचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात पडताना दिसत आहेत. संबंधित घटनेप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे. तसेच त्यांनी माफी मागितली नाही तर मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे.
संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी हा इशारा दिला आहे. “नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची माफी मागावी. अन्यथा आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये पाय ठेवू देणार नाही”, असा इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे.
“आळंदीत एका खोलीत कोंडून झालेली मारहाण अर्थात वारकऱ्यांवर झालेला हल्ला हा शिंदे-फडणवीस सरकारचा नाकर्तेपणा आहे. वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून माफी मागा”, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, आळंदी देवस्थानकडून कालच्या घटनेवर भूमिका मांडण्यात आली आहे. “काल घडलेल्या घटनेत आळंदी देवस्थानचा संबंध नव्हता. आनंदाच्या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. कालचा प्रकार हा गैरसमजतीतून झालाय. एकूण 47 दिंड्या आहेत, त्यामधील 75 वारकऱ्यांना पास दिले होते”, अशी प्रतिक्रिया आळंदी देवस्थानकडून देण्यात आलीय.
“वारकरी शिक्षण संस्थेतीलही मुलांनाही देवस्थानचे पास दिले होते. मात्र अधिक संख्या असल्याने त्यांनी हट्ट घातला. मुलं वारकरी म्हणून हट्ट करत होती आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस काम करत होते चुका शोधत बसण्यापेक्षा सुधारणा करूयात. याचं कोणीही राजकारण करू नये”, असं आवाहन आळंदी देवस्थानकडून करण्यात आलंय.