दुजाभाव करू नका, संभाजीराजे शिवजयंती सोहळ्यात भडकले, शिवनेरीच्या पायथ्याशी रंगले मानापमान
पुरातत्त्व विभागाने सांगितलं महाराजांचा जन्म झाला तिथे जाता येणार नाही. तसं असेल तर मग इतर कुणालाही तिथं जाऊ देऊ नका. फक्त शिवप्रेमींनाच बंदी का? पुरातत्त्व खात्याचा हा कुठला नियम आहे?
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण राज्यात अत्यंत उल्हासात आणि जल्लोषात साजरी होत असताना शिवनेरीवर मात्र मानापमान नाट्य रंगलेलं दिसलं. शिवप्रेमींना शिवनेरीवर दर्शन घेण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र, काही व्हिआयपींना पासेस देऊन शिवनेरीवर सोडण्यात येत होते. हा प्रकार पाहून माजी खासदार संभाजी छत्रपती प्रचंड संतापले. हा दुजाभाव कशासाठी? सर्वांनाच प्रवेश दिला पाहिजे. शिवनेरीवर दुजाभाव होता कामा नये. जोपर्यंत शिवप्रेमींना शिवनेरीवर सोडलं जात नाही. तोपर्यंत मीही शिवनेरीवर जाणार नाही, असा आक्रमक पवित्राच संभाजीराजे यांनी घेतला. त्यामुळे शिवनेरीवर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
माजी खासदार संभाजीराजे हे शिवनेरीवर शिवजयंतीसाठी आले होते. मात्र, शिवनेरीवर शिवप्रेमींना सोडलं जात नसल्याचं लक्षात आल्यानंतर संभाजीराजे प्रचंड भडकले. त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत शिवप्रेमींना शिवनेरीवर सोडलं जाणार नाही, तोपर्यंत मीही शिवनेरीवर जाणार नाही, असा पवित्रा घेत संभाजी राजे यांनी शिवप्रेमींच्या गराड्यातच थांबणं पसंत केलं. त्यांनी शासकीय कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला.
दरवर्षी नियोजन नसतं
संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहूनच त्यांच्याशी संवाद साधला. दुजाभाव करू नका. आम्ही दरवर्षी येतो. पायी येत असतो. त्यामुळे शिवप्रेमींना शिवाजी महाराजांचं दर्शन घेता आलं पाहिजे. तुम्ही शिवजयंती साजरी करा. जयंती साजरी केली पाहिजे. आमची त्याला ना नाही. पण शिवनेरीवर दरवर्षी नियोजन नसतं. आम्ही किती सहन करायचं? दुजाभाव करू नका. सर्वांना दर्शन घेण्याचा अधिकार आहे, असं संभाजीराजे म्हणाले.
मग कुणालाही जाऊ देऊ नका
पुरातत्त्व विभागाने सांगितलं महाराजांचा जन्म झाला तिथे जाता येणार नाही. तसं असेल तर मग इतर कुणालाही तिथं जाऊ देऊ नका. फक्त शिवप्रेमींनाच बंदी का? पुरातत्त्व खात्याचा हा कुठला नियम आहे? आम्हाला तुमची भाषण ऐकायची आहे. बाकीच्या गड किल्ल्यांचं संवर्धन कसं करणार हे सुद्धा आम्हाला पाहायचं आहे. त्याचं उत्तर द्या, असं आव्हान त्यांनी दिलं.
पास कशाला?
शिवनेरीवर शिवजयंतीचा शासकीय कार्यक्रम आहे. त्यांना त्यांची भाषणं करू द्या. मी तुमच्यासोबत आहे. कार्यक्रम झाल्यावर आम्हाला आत जाऊन दर्शन घेऊ द्या. पर्सनल पास कशाला देता? हा कोणता क्रायटेरिया आहे? जिल्हाधिकाऱ्यांनी कोणता नियम लावला? दर्शनात दुजाभाव का? असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांचं आवाहन
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातात माईक घेऊन संभाजीराजे यांना कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मी तुमच्या भावनांची नोंद घेतली आहे. तुमच्या भावना ऐकल्या आहेत. हे सरकार तुमचं आहे. आपलं आहे. आपण किल्ले जपण्याचं काम करू. पुढच्या वर्षीचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात येईल असं आश्वासन मी तुम्हाला देतो, असं आश्वासन मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी दिलं.